Breaking News
नवी मुंबई ः महापालिका कार्यक्षेत्रातील 23 नागरी आरोग्य केंद्रात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डास अळी नाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम गेली 20 वर्ष राबवण्यात येत असूनही डासांच्या उत्पत्ती स्थानात प्रत्येक वर्षी वाढ होत असल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्य विभागाकडून विशिष्ट ठेकेदारांकडून ही ‘उज्वल’ फवारणी करुनही नवी मुंबईत डासांना ओतू आल्याने डास फवारणी व धुरीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी डास फवारणी व धुरीकरणाचा कार्यक्रम संपुर्ण नवी मुंबईत राबवत असते. सन 2020-21 साठी नवी मुंबई महानगरपालिका 11.35 कोटी रुपये खर्च करणार असून ही निविदा पाच वर्षांसाठी देण्यात आली आहे. त्यामध्ये सोबेस्ट सर्व्हिसेस, मे. सुरज एंटरप्रायझेस, मे. कल्पतरु हॉस्पिटॅलिटी अॅण्ड फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, पालवे पेस्ट कंट्रोल प्रा. लि., नेशन टेक्नो पेस्ट कंट्रोल या ठेकेदारांचा समावेश आहे. गेले अनेकवर्ष याच ठेकेदारांकडून ही कामे करुन घेत असल्याचे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे.
गेली 20 वर्ष डास अळी नाशक फवारणी व धुरीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत असूनही दरवर्षी मात्र डास उत्पत्ती स्थानात वाढ होत असल्याचे उघडकीस आले आहे. आर्श्चयाची बाब म्हणजे एवढी उज्वल फवारणी करुनही कायमस्वरुपी डासांच्या ठिकाणात मात्र वाढ होत असल्याने नागरिकांच्या कराचा कोट्यावधींचा धूर नक्की कोणासाठी काढला जातो असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
ही निविदा बनवताना 2015 पेक्षा 2018 मध्ये लोकसंख्या वाढल्याने खर्चात वाढ झाल्याचे अंदाजपत्रकात नमुद केले आहे. या कामात 8.40 कोटी रुपये वेतनावर, 1 कोटी रुपये डिझेल-पेट्रोल फवारणीसाठी, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय खर्चासाठी 41 लाख रुपये तर सेवाशुल्क म्हणून 1 कोटी अदा करण्यात येत आहेत. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रातील क्षेत्रात आठवड्याला 7 ते 10 वेळा धुरीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे फवारणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डासांचा प्रार्दुभाव वाढल्यावर आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतरच आरोग्य विभाग खडबडून जागा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कायमस्वरुपी डास उत्पत्ती स्थानांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नवी मुंबईकर करत आहेत.
बेलापुर 81403 111325
नेरुळ 70201 51450
तुर्भे/सानपाडा 35115 34090
कोपरखैरणे 82743 96774
वाशी 37179 39761
घणसोली 86023 75990
ऐरोली 35568 17744
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे