
आंबेडकर भवनाला 17 कोटींचा चूना
- by संजयकुमार सुर्वे
- Apr 08, 2022
- 1123
नवी मुंबई ः पालिकेने 17 कोटी खर्च करुन डॉ.आंबेडकर भवनाच्या डोमला मार्बलचे आच्छादन देण्याचे काम हाती घेतले होते. नुकतेच हे काम पुर्णत्वास गेल्याचा डंका महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पिटला आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करुन नव्याने काम करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
दिल्लीतील लोटस टेम्पलला ज्याप्रमाणे मार्बल आच्छादन करण्यात आले होते त्याच धर्तीवर ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याचा हट्ट तत्कालीन महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाकडे धरला होता. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचे सांगत तो फेटाळून लावला होता. परंतु त्यासाठी नेमलेल्या आयआयटीतील तज्ञांच्या समितीनेही मार्बलच्या वजनामुळे डोमच्या संरचनेला धोका असल्याचा अहवाल दिला होता. परंतु, त्यावेळचे महापौर सोनावणे यांनी केलेल्या मागणीनुसार हा प्रस्ताव आयुक्त रामास्वामी यांच्या काळात मंजुर करण्यात आला.
डोमला मार्बल लावण्यासाठी मकराना येथील मार्बल निवडण्यात येऊन ज्या तंत्रज्ञानाने दिल्लीच्या लोटस टेम्पलला मार्बल लावण्यात आले त्याच धर्तीवर हे काम करण्यात येईल असे आश्वासन सोनावणे यांनी त्यावेळी सभागृहात दिले. या कामासाठी अंदाजपत्रकात 9 कोटींचे मार्बल व ते लावण्यासाठी 4 कोटींची परांची असे मिळून 13 कोटींचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आला. कामास विलंब झाल्याने पुन्हा परांचीच्या खर्चापोटी विद्यमान आयुक्त व प्रशासक यांनी 4 कोटींचा वाढीव खर्च या कामासाठी मंजुर केला. नुकतेच डोमला मार्बल लावण्याचेे काम पुर्ण झाले असून हे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पालिकेने केलेला 17 कोटींचा खर्च वाया गेल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. डोमला लावण्यात आलेले मार्बल हे एकाच आकाराचे नसून जशी जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणात ते लावल्याने मार्बल लावण्याचा उद्देश निष्फळ ठरला आहे. त्याचबरोबर ते सरळ रेषेत व एकाच पातळीवर न लावल्याने ओबडधोबड दिसत आहे.
- आंबेडकरी जनतेचा आंदोलनाचा इशारा
ठेकेदार निकृष्ठ काम करत असताना पालिकेचे अभियंता काय करत होते? असा सवाल नवी मुंबईकर उपस्थित करत आहेत. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणार्या या अधिकार्यांकडून याची भरपाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आंबेडकर भवनास भेट दिलेल्या अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. - करायला गेले एक झालं भलतेच
दिल्लीतील लोटस टेम्पलला ज्याप्रमाणे मार्बल आच्छादन करण्यात आले होते त्याच धर्तीवर ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याचे प्रयोजन पालिकेने केले होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. मार्बल लावण्याचे काम साचेबद्ध न करता ओबडधोबड केल्याने संपुर्ण स्मारकाची सुंदरता लोप पावली आहे. यामुळे करायला गेले एक आणि झाले भलतेच अशी टिका नवी मुंबईकर करत आहेत. - पालिका अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करा
मार्बल लावण्याच्या कामात एकसंगता नसल्याने कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. तसेच हे स्मारक नवी मुंबईचे आकर्षण ठरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र जनतेचे 17 कोटी रुपये वाया घालवणार्या पालिका अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे. ठेकेदाराने वाकडेतिकडे लावलेले मार्बल काढून पुन्हा नव्याने सरळरेषेत मार्बल लावण्याची मागणी पुन्हा होत आहे. - 17 कोटी रुपये खर्च करुन डोमला मार्बलचे आच्छादन लावण्याचा हट्ट धरणारे आणि आंबेडकर भवनाच्या सौंर्द्यात भर पडेल असे सांगणार्या माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी या कामाकडे का दुर्लक्ष केले असा प्रश्न विचारला जात आहे.
दिल्लीतील लोटस मंदिराला मार्बल बसविण्याचे सुरूवातीपासुनच निश्चित होते. आंबेडकर भवनाला मार्बल लावण्याचा निर्णय हा नंतर घेण्यात आल्याने लोटस टेम्पलसारखी फिनिशिंग या वास्तूस येणे अपेक्षित नाही. परंतु कामाच्या दर्जात जर तडजोड झाली असेल तर संबंधित वास्तूविशारद, अभियांत्रिकी विभाग यांची बैठक घेऊन यामध्ये सुधारणा करता येणार असेल तर योग्य ते निर्देश अभियांत्रिकी विभागाला देण्यात येतील. - अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
आंबेडकर भवनाला लावलेले मार्बल हे आकर्षक नसल्याबाबत तेथे भेट दिलेल्या अनेक अनुयायांनी मला सांगितले आहे. त्याबाबत मी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करेन. हे स्मारक नवी मुंबईतील आंबेडकर चळवळीसाठी स्फूर्तीस्थान ठरणार आहे. या कामात जर पालिकेने हयगय केली असेल तर ती बाब मी पालिका आयुक्तांच्या नजरेस आणून देईन. सदर काम नित्कृष्ट दर्जाचे असेल तर पालिका आयुक्तांना त्यात सुधारणा करण्याचे सांगण्यात येईल. - सिध्दराम ओव्हळ, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे