स्कॅनिंग मशिनमुळे कंटेनर तपासणी वाढणार

ताशी 100 कंटेनरची तपासणी ः वर्षाला सहा लाख कंटेनर्सचे स्कॅनिंग 

नवी मुंबई ः जेएनपीटी अंतर्गत कस्टम हाऊस येथे अत्याधुनिक ड्राइव्ह थ्रू कंटेनर स्कॅनिंग मशिन उभारण्यात आली आहे. या अत्याधुनिक स्कॅनिंग मशिनमुळे कंटेनर तपासणीत तीनपट वाढ होऊन वर्षाला सहा लाख कंटेनर्सचे स्कॅनिंग करता येणार आहे. या कंटेनर स्कॅनिंग मशिनचे लोकार्पण रविवारी सीमा शुल्क (कस्टम) विभाग सेंट्रल बोर्डाचे विशेष सचिव प्रणबकुमार दास यांच्या हस्ते करण्यात आले. 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार व्यापारी सेवांच्या आधुनिकतेसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सन 2016 मध्ये नॅशनल ट्रेड फॅसिलिटेशन अ‍ॅक्शन फ्लॅन प्रकाशित होऊन पोर्ट विभागामध्ये भौतिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कार्गो व्यापारावर लक्ष केंद्रित करतानाच आयात आणि निर्यात कार्गो सेवा अधिक वेगवान करण्यासाठी वेगवान कंटेनर स्कॅनिंग मशिन जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसमध्ये बसविण्यात आल्याचे प्रणबकुमार दास यांनी सांगितले. कंटेनरद्वारे होणारी मालाची तस्करी आणि सुरक्षितता याचा विचार करता कस्टम विभागाला नेहमीच सतर्क लहावे लागते. आधुनिकतेमुळे नवनवीन आव्हानांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे कंटेनर स्कॅनिंगसाठी अधिकारी प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे नेमण्यात आलेल्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय येथे ड्युटी नसलेल्या अधिकार्‍यांनाही ड्राइव्ह थ्रू कंटेनर स्कॅनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसमध्ये यापूर्वी मानवीय पद्धतीने कंटेनरची तपासणी आणि कस्टम क्लिअरिंगचे काम केले जात होते. यामध्ये बराच वेळ लागत असल्याने हजारो कंटेनर कस्टम क्लिअरन्ससाठी तासनतास रांगेत राहत असत. त्यामुळे या प्रक्रियेसाठी वेळ कमी घेऊन व्यापार वृद्धीसाठी येथे मोबाइल स्कॅनर बसविण्यात आले. परंतु याद्वारे केवळ प्रति तास 25 कंटेनर तपासणी होत असते. तर, फिक्स स्कॅनिंगद्वारे 10 ते 15 कंटेनरची तपासणी तासाला होत आहे. त्यामुळे येथे आता अत्याधुनिक पद्धतीचे कंटेनर स्कॅनिंग (ड्राइव्ह-थ्रू-एक्स-रे स्कॅनर)च्या माध्यमातून ताशी 100 कंटेनरची तपासणी शक्य झाल्याचे जेएनसीएचचे मुख्य आयुक्त विवेक जोहरी यांनी सांगितले. सद्यस्थितीत जेएनपीटी पोर्टअंर्तगत चार टर्मिनलमार्फत वर्षाला जवळपास 24 लाख कंटेनरची हाताळणी केली जाते. त्यात पूर्वीच्या स्कॅनिंगद्वारे केवळ आठ टक्के म्हणजेच दोन लाख कंटेनरची तपासणी होत असते. परंतु आता नवीन स्कॅनिंग मशिनमुळे कंटेनर तपासणीत तीनपट वाढ होऊन वर्षाला सहा लाख कंटेनरची स्कॅनरद्वारे तपासणी शक्य झाले आहे. कोचीन, मुंडर आणि कृष्णापट्टणम बंदरांप्रमाणे याता जेएनपीटीमध्येही या कंटेनर स्कॅनरद्वारे तपासणी होणार आहे.