Breaking News
मुंबई ः मसाल्यात आणि दररोजच्या भाजीत मिरचीचं काय स्थान असतं, हे सर्वज्ञात आहे. अलिकडच्या काळात नेहमीची मिरची आणि सिमला मिरची यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांचं उत्पादनही वाढत आहे; परंतु खप फारसा वाढत नसल्याने भावाचं गणित कोलमडून पडत आहे. बाजारात मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला की त्याची परिणती भाव कोसळण्यात होते. आता तोच अनुभव सध्या शेतकर्यांना येत आहे. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकर्यांना मिरचीचा ठसका बसला. येवल्यात शेतकर्यांना टोमॅटोच्या लाल चिखलानंतर मिरचीचा ठसका बसला आहे. येवला तालुक्यातल्या अंदरसूल इथल्या शेतकर्याने कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने मिरचीचं उभं पीक कापून टाकलं आहे. मिरचीची लागवड करताना लाखो रुपये खर्च केले; मात्र आता भाव पडल्याने शेतकर्यांसमोर मिरची काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
कांद्याच्या पिकात फायदा होत नसल्याने वेगळे प्रयोग करावेत म्हणून शेतकर्यांनी मिरचीचं पीक घेतलं. शेतकर्यांना मिरचीचं बियाणं, लागवड, कीटकनाशकं आदींसाठी एकरी सरासरी सव्वा लाख रुपये खर्च येतो. एका एकरात सरासरी वीस क्विंटल मिरची निघते. अपवादात्मक शेतकरी त्यापेक्षा जास्त उत्पादन घेतात; परंतु त्यांचं प्रमाण कमी आहे. किलोला साठ रुपये भाव मिळाला तरच शेतकर्यांचा उत्पादनखर्च निघतो. मिरचीच्या तोडणीसाठी बाहेरून मजूर आणावे लागतात. मिरची तोडून बाजारात पोहचवण्याचा खर्च वेगळाच. या पार्श्वभूमीवर सध्या मिरचीला ठोक बाजारात मिळत असलेला भाव शेतकर्यांच्या श्रमाची चेष्टा करणारा आहे. प्रती किलो दोन आणि तीन रुपये भाव मिळत असेल तर एकरी सहा हजार रुपये मिळतात. त्यातून वाहतुकीचाही खर्च निघत नाही. दिवसेंदिवस मिरचीला कवडीमोल भाव मिळत गेल्याने अलिकडेच संतप्त शेतकर्यांनी आपलं मिरचीचं उभं पीक उपटून बांधावर फेकून दिलं.
स्थानिक बाजारपेठेत किलोला तीन रुपये भाव मिळत असल्याने काही शेतकर्यांनी मिरची मुंबईमध्येविक्रीला नेली. पण तिथेही किलोला नऊ रुपये मिळाले. त्यामुळे वाहतूकखर्च खिशातून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली. उत्पादन खर्च दूरच राहिला; काढणी आणि वाहतूक खर्चही न निघाल्याने शेतकर्यांनी उभ्या पिकावर आपला संताप काढला. वेगवेगळ्या पिकांबाबत अधूनमधून भावाचा असा अनुभव येत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. प्रधानमंत्री पीक विम्यातून मिरची पिकाला वगळण्यात आलं आहे. नैसर्गिक आपत्तीने मिरचीचं नुकसान झाल्याने शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जात असते. राज्यात सर्वाधिक मिरची नंदुरबार जिल्ह्यात होते. या वर्षी पाऊस कमी असतानाही मिरचीच्या क्षेत्रात थोडीफार घट आली आहे. या वर्षी आतापर्यंत सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे. मिरचीवर पडणार्या विविध रोगांनी मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत असतात. त्यात दर वर्षी येणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत असतो; मात्र मिरचीचा पीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही
सिमला मिरचीची अवस्थाही अशीच काहीशी झाली आहे. मिरचीला मातीमोल बाजारदर मिळत असल्याने येवल्यातल्या शेतकर्याने सिमला मिरची रस्त्याच्या कडेला फेकून संताप व्यक्त केला. सिमला मिरचीला बाजारात प्रती किलो चार ते पाच रुपये असा दर मिळत आहे. येवला इथल्या बाजार समितीमध्ये सिमला मिरची विक्रीसाठी नेली असता अकरा किलोच्या क्रेटला 35 ते 45 रुपये इतका बाजारभाव मिळाला. उत्पादनावर झालेला खर्च आणि पदरात पडत असलेलं उत्पन्न याची गोळाबेरीज करण्यापेक्षा शेतकर्यांनी मिरची रस्यावर फेकून देणंच पसंत केलं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई या गावात तसंच जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणी हिरव्या मिरचीच्या खरेदी-विक्रीच्या बाजारपेठा आहेत. या दोन्ही बाजारपेठांमध्ये ठोक खरेदीचे भाव मोठया प्रमाणावर घसरल्याने काही शेतकर्यांनी मिरच्या रस्त्यावर फेकून दिल्या. कमी भावाने मिरची खरेदी करण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आणि व्यापार्यांमध्ये वाद होत आहेत. तीन शेतकर्यांना मारहाणही झाली; परंतु विरोधकांना त्याचं काहीच पडलेलं नाही. सरकार तर मूग गिळून बसलं आहे. या वर्षीच्या हंगामात प्रारंभीच्या काळात मिरचीला प्रति क्विंटल चार ते पाच हजार रुपयांदरम्यान भाव मिळत होता. आवक वाढल्यानंतर हा भाव पंधराशे रुपयांवर आला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai