Breaking News
पनवेल : पनवेल पालिकेच्यावतीने भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्राचे उद्घाटन पोदी येथील श्वान नियंत्रण केंद्रात आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी नसबंदी कायदा राबविण्याच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, इंडिया संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्र सरू केले आहे. या केंद्रामध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या मांजरी तसेच भटक्या मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येत आहे.
वर्षाला सरासरी 300 मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण व 200 आजरी मांजरींवर औषधोपचार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या केंद्रावरती दर मंगळवार, गुरूवार, शनिवार मांजरीचे 9 ते 5 यावेळेत लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेकडे या केंद्राकडे चार रूग्णवाहिका असून यामाध्यमातून भटके कुत्रे व भटके मांजर पकडण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेत एक हजार मोकाट मांजरी असल्याचा अंदाज पालिकेने बांधला आहे. कुत्र्यांच्या पाठोपाठ मांजरांचे निर्बिजीकरण तसेच लसीकरण करणारी यंत्रणा मुंबई महानगरपालिकेने सुरु केली आहे. त्या पाठोपाठ पनवेल महानगरपालिकेचा क्रमांक लागत आहे.राज्यात केवळ दोनच महानगरपालिककेत हे केंद्र सुरु आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai