80 इमारती अतिधोकादायक
- by Aajchi Navi Mumbai
- May 23, 2025
- 164
पनवेल : कल्याणमध्ये नुकत्याच घडलेल्या धोकादायक इमारतीच्या दुर्घटनेनंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. पनवेल महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, एकूण 80 इमारतींना ‘सी-1’ म्हणजेच अतिधोकादायक असा वर्ग देण्यात आला आहे. अजूनही 20 टक्के इमारतींमध्ये रहिवाशी राहत असल्याने आयुक्तांनी धोकादायक इमारतींमध्ये न राहण्याचे आवाहन रहिवाशांना केले आहे.
या इमारती प्रभाग समिती अ ; 18, प्रभाग ब; 15, प्रभाग क; 10, आणि प्रभाग ड; 37 अशा चारही प्रभागांमध्ये आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ स्थलांतर करावे, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. संबंधित इमारतींमधील रहिवाशांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 265 व 268 नुसार नोटीस देण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, जर रहिवाशांनी स्थलांतर न केल्यास व इमारत स्वतःहून पाडली नाही, तर पालिका वीज व पाणीपुरवठा खंडित करून पोलिसांच्या मदतीने ती इमारत रिकामी करून पाडणार आहे. अशा दुर्घटनांमध्ये जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास जबाबदारी मालक, भोगवटादार आणि रहिवाशांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. धोकादायक इमारतींची स्ट्रक्चरल ऑडिट जबाबदारी संबंधित मालकांची असून, पालिकेने संकेतस्थळावर इमारतींची माहिती उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी अशा इमारतींची माहिती जवळच्या प्रभाग अधिकाऱ्यांना द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. आणीबाणीच्या स्थितीत टोल फ्री क्रमांक 1800-233-0009 किंवा 022-7458040 /41 /42 वर संपर्क साधावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai