Breaking News
पनवेल : महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये (दवाखाना) 10 रुपयांत वैद्यकीय उपचार त्यावरील औषधे आणि विविध तपासण्या होत असल्याने केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पालिका प्रशासनाने दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत हे दवाखाने सूरु ठेवल्याने नागरिकांची वैद्यकीय सोय होत आहे. यापूर्वी ताप, थंडी आणि इतर आजारांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये प्रतिभेटीचा आणि औषधांचा खर्च 500 रुपयांवर रहिवाशांना करावा लागत होता. मात्र या केंद्रांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पनवेल शहरासह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल आणि कामोठे या वसाहतींमध्ये पालिकेने सकाळी नऊ ते रात्री 10 वाजेपर्यंत दवाखाने सूरु केले आहेत. पनवेल पालिकेने मालमत्ता कराच्या वसूलीसोबत नागरिकांना देण्यात येणा-या सेवांमध्ये वैद्यकीय सेवेला प्राधान्य दिले आहे. वैद्यकीय सेवेसाठी पालिकेने अधिकची तरतूद केली आहे. शहरी भागासोबत पालिकेने ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेला प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून पालिकेने दुपारी दोन ते रात्री 10 वाजेपर्यंत दवाखाने सूरु ठेऊन नोकरदारांना दिलासा दिला आहे.
पालिकेच्या शहरी भागातील दवाखान्यांमध्ये सकाळचे 90 पेक्षा अधिक रुग्ण आणि रात्रीच्या सत्रात 40 पेक्षा अधिक रुग्ण प्रत्येक दवाखान्यातून सेवा घेत आहेत. खारघरमध्ये पालिकेचा आपला दवाखान्यातून रात्रीच्या सत्रात शंभराहून अधिक रुग्ण वैद्यकीय सेवा घेत आहेत. 10 रुपयांमध्ये संबंधित रुग्णाने केसपेपर काढल्यानंतर या दवाखान्यात वैद्यकीय उपचार, सल्ला आणि औषधे मोफत दिली जातात. तसेच रक्त व लघवीच्या तपासण्या मोफत होतात. यामुळे पालिकेचे दवाखाने रहिवाशांसाठी वैद्यकीय आधार बनला आहे. पालिकेने नागरिकांची सोय ध्यानात घेऊन रात्र दवाखाने सूरु केल्याने खासगी दवाखान्यांतील रुग्णसंख्या कमी होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai