‘स्वामित्व योजने’ला सुरुवात

 मुंबई : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या जागांचे दस्तावेज प्रदान करणार्‍या ‘स्वामित्व’ योजनेचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील 1 लाख मालमत्तांचे मालक आपल्या मालमत्तेचे कार्ड मोबाईल फोनवर एसएमएस लिंकद्वारे डाऊनलोड करू शकणार आहेत. त्यानंतर राज्य शासनाच्या मार्फत प्रत्यक्ष कार्ड त्यांना देण्यात येईल.

आपल्या हक्काच्या मालमत्तेचे दस्तावेज सुलभपणे सुपूर्त करणारी ‘स्वामित्व’ योजना ऐतिहासिक असून त्यामुळे ग्रामीण भागातील संघर्ष संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडून येतील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या योजनेमुळे लाभार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मजबुती मिळाली आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिण्यात आलं. लाभार्थ्यांना हे कार्ड आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही लिंक मिळणार आहे. जे ‘संपत्ती कार्ड’ डाऊनलोड करू शकतात. 

लोकनायक जयप्रकाश नारायण आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेचे आज लोकार्पण करण्यात आले. या दोन आदरणीय व्यक्तिमत्वाचा जन्मदिन एकाच दिवशी आहे एवढेच त्यांच्यातील साम्य नाही. त्यांचा संघर्ष आणि आदर्शही सामान आहे, असे पंतप्रधान यांनी नमूद केले. मोदी म्हणाले, स्वामित्व योजना ही आधुनिक आणि पारदर्शी आहे. हा माझा किंवा हा तुझा असा कोणताही भेदभाव यामध्ये नाही. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळतील. तसेच कोणताही वाद न होता प्रत्येक गावाचा सुनियोजित पद्धतीने विकास होईल. या योजनेतंर्गत 6 राज्याच्या 763 गावातील गावकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे 346 गावे, हरियाणाचे 221 गावे, महाराष्ट्रातील 100गावे, मध्य प्रदेशचे 44 गावे, उत्तराखंडचे 50 गावे आणि कर्नाटकच्या 2 गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील लाभार्थींना एका दिवसांत फिजिकल कार्ड मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गावात राहणार्‍या नागरिकांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयोगी पडणार असून जागेवरील मालकीहक्कांबाबतचे वाद संपुष्टात येतील. शिवाय, या योजनेमुळे गावात राहणार्‍या लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एक कायदेशीर दस्तावेज म्हणून ‘संपत्ती कार्ड’चा वापर करता येणार आहे. या योजनेत दिल्या जाणार्‍या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.