422 वाहन चालकांवर कारवाई

 नवी मुंबई ः नववर्षाच्या पार्श्‍वभुमीवर शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये वाहतुक नियमन तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या एकुण 422 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, विना हेल्मेट, विना सिट बेल्ट, ट्रिपल सिट वाहने चालवणार्‍यांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. 

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वचजण वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजन करतात. यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. दरम्यान, वाहन धारकांकडून नियम धाब्यावर बसवून वाहेन चालविल्याने अपघातांना आमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी वाहतुक पोलीसांकडून नियम उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. यावर्षीही पोलीस आयुक्त बिपीन कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, वाहतुक नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक विभागाकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 31 डिसेंबर 2020 पासून ते 1 जानेवारी 2021 च्या पहाटेपर्यंत वाहतुक नियमन तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महामार्गावरील टोल नाके, शहरातील महत्वाचे चौक, सिग्नल, जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. या नाकेबंदीमध्ये मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍या 27, विना हेल्मेट दुचाकी चालविणे 270, विना सिट बेल्ट कारवाई 101, ट्रिपल सिट वाहन चालविणे 24 अशा एकूण 422 वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.