Breaking News
नवी मुंबई : चालत्या कारवर चढून स्टंटबाजी करणाऱ्या महिलेवर खारघर पोलिसांनी कारवाई केल्याची गत आठवड्यातील घटना ताजी असतानाच दिघा परिसरात चालत्या रिक्षावर स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत रिक्षावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणासह त्याला स्टंटबाजी करणाऱ्या त्याच्या दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
27 तारखेला मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तरुणाने भर पावसात धावत्या रिक्षाच्या मागे उभे राहून स्टंटबाजी केली होती. या रिक्षाच्या मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने या स्टंटबाजींचे मोबाईलवरुन चित्रीकरण करुन सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी रिक्षावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला असता, सदरची घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गावर दिघा येथील मुकुंद कंपनी समोर घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी स्टंटबाजी करतानाच्या व्हिडीओमधुन रिक्षा क्रमांकांवरुन रिक्षाचा शोध घेतला असता, सदर स्टंटबाजी करणारे तरुण व रिक्षा दिघ्यातील असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती काढली असता, अमितकुमार राजेश घुरीया (22) हा तरुण रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचा साथीदार आकाश उर्फ कल्लू जयवंत चौहान (22) याने स्टंटबाजी केल्याचे उघड झाले. तर त्यांचा तिसरा साथिदार ओमकार आदिमल्लीव बाप्रप (22) याने स्टंटबाजी करण्यासाठी त्याची रिक्षा दिल्याचे आढळुन आले. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात बीएनएस कलम 281,125 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना नोटीस बजावुन त्यांना सोडुन देण्यात आल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai