सरपंच दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 30, 2025
- 194
जमीन प्रकरणात दीर्घ काळ न्याय मिळत नसल्याने टोकाचे पाऊल
पनवेल ः तालुक्यातील चिखले गावातील गायरान जमीन प्रकरणात दीर्घ काळ न्याय न मिळाल्याने गावच्या सरपंच दिपाली तांडेल व त्यांचे पती दत्तात्रय यांनी मंगळवारी राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारी अधिकारी, पोलिसांनी सरपंच व त्यांच्या पतींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या या संवादाला यश आले नाही. अखेर सरपंचांनी घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाच स्वताला कोंडून घेत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या तांडेल दाम्पत्यावर पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
17 मार्च रोजी सरपंच तांडेल व त्यांच्या पतींनी उपोषण सुरू केले होते. सलग 12 दिवस उपोषण केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी 8 दिवसांत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत ना बैठक झाली, ना निर्णय झाला. सरपंच दिपाली व त्यांच्या पतीने सांगितले की, न्याय मिळत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत आहोत. ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या गायरान जमिनीचा साठे करार करून तो करार रजिस्टर नोंदणी केला गेला. तसेच त्याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा करूनही पोलीस व महसूल विभाग माती चोरांना पकडू शकले नाही आणि बेकायदा पद्धतीने जमिनीचे साठेकरार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करु शकले नाही त्यामुळे सरपंच तांडेल व त्यांच्या पतीने संतापाने हे पाऊल उचलल्याचे मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
या गैरव्यवहारामध्ये याच गावचे तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवकांचा सुद्धा हात असल्याचा आरोप तांडेल यांनी केलेल्या अर्जात केला आहे. या जमिनीचा लाभ घेणारे मोकाट सुटू नये म्हणून त्यांच्यावर चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी माफक मागणी तांडेल दाम्पत्यांची होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तांडेल दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले.
- 16 जणांविरोधात गुन्हा नोंदवला
चिखले गावामध्ये मंगळवारी सरपंच व त्यांच्या पतीने देहत्याग करण्याचा इशारा दिल्याने त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पनवेलच्या गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन दुपारी सव्वातीन वाजता गावातून पनवेलकडे येत असताना काही ग्रामस्थांनी अडविले. याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर 16 जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai