Breaking News
मनसेच्या शिष्टमंडळाची वाहतुक विभागाकडे मागणी
नवी मुंबई : गत आठवड्यात कर्तव्य बजावत असताना महापे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराचा महापे उड्डाणपुलाखाली क्रेनखाली येऊन मृत्यू झाला. सदर बाब अत्यंत गंभीर असून यानिमित्ताने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांची भेट घेतली. वाहतूक विभागाने भरारी पथके नेमून अवजड वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अपघाती घटनांमुळे वाहतुक पोलीसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनसेचे प्रवक्ते तथा शहरअध्यक्ष गजानन काळे आणि मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांची भेट घेतली. नवी मुंबईतून प्रवास करणारी बहुतांश अवजड वाहने वाहतूक विभागाच्या नियमांचे पालन करत नाही. ट्रक, ट्रेलर, डंपर, क्रेन, कंटेनर सारखी अवजड वाहने सर्रासपणे अतिलोड करून वाहतूक करतात. लेन आणि वेगमर्यादा यांचे वारंवार उल्लंघन होत असते. एवढी मोठी अवजड वाहने चालक एकटाच चालवत असतो. त्याच्याबरोबर एक मदतनीस असणे आवश्यक आहे. अवजड वाहनांच्या चालकांचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नसते. चारित्र्य पडताळणी झालेली नसते. ते अपघाताला निमंत्रण देणारे आहे. शालेय बसची सुध्दा अशीच दुर्दशा आहे. या बाबतीत वाहतूक विभागाने भरारी पथके नेमून अवजड वाहने, शालेय बस यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना गजानन काळे यांनी उप-प्रादेशिक अधिकारी गजानन गावंडे यांना केली. तसेच नियम न पाळणाऱ्या वाहतुकदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी लवकरच सदर सर्व बाबींवर कारवाई करण्याचे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
मनसेच्या शिष्टमंडळात गजानन काळे, नितीन खानविलकर यांच्यासह वाहतूक सेना उपाध्यक्ष विलास घोणे, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, निखील गावडे, अक्षय भोसले, महिला सेना विभाग अध्यक्ष शीतल दळवी, मनसे शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे, गणेश पाटील, मनविसे उपशहरअध्यक्ष प्रतिक खेडकर तसेच मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, वाहतूक सेना पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai