Breaking News
नवी मुंबई : कोरोनाकाळात आरोग्य सेवा पुरविताना पालिकेचा आरोग्य विभाग तोकडा पडला होता. त्यामुळे पालिकेने तात्पुरत्या स्वरुपात मनुष्यभरती केली होती. परंतु आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने पालिकेने या कोरोनाकाळातील आरोग्यसेवकांना कार्यमुक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 1418 जणांना कार्यमुक्त केले आहे. केवळ 493 जणांना तात्पुरत्या सेवेत ठेवले असून त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्र येथे 1200 खाटांचे जम्बो करोना उपचार केंद्र सुरू केले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी करोना काळजी केंद्रे उभारली. दुसर्या लाटेत पहिल्यापेक्षा उपाचाराधीन रुग्णांची संख्याही कित्येक पटीत वाढलेली होती. या दोन्ही वेळेस पालिकेने मोठ्या प्रमाणात तात्पुरती आरोग्यसेवकांची भरती प्रक्रिया राबवली होती. यामध्ये एमडी, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध प्रकारांतील 1911 जणांची तात्पुरती भरती केली होती. कोरोनाबरोबरच शहरभर राबवण्यात येत असलेल्या लसीकरण कामीही या तात्पुरत्या वैद्यकीय कर्मचार्यांची पालिकेला मदत होत आहे. परंतु शहरात कोरोनाची स्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. त्याप्रमाणे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. त्यामुळे यातील अनेक जणांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. 1911 जणांमधील 493 जणांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai