Breaking News
श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्यावतीने आयोजन
नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी खास मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळागौरी कार्यक्रम रविवार 27 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे होणार आहे. अशी माहिती श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा तथा बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
नवीन लग्न झाल्यावर नववधुंसाठी अनेक विधी असतात, अनेक सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर अनेक विधी पुजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीच्या जीवनातील असाच एक साजरा करण्यात येणारा सण अर्थात ‘मंगळागौर’ होय. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था’ गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने सांस्कृतिक महोत्सव आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असते. त्याअनुषंगाने ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने रविवार दि. 27 जुलै 2025 रोजी आयोजित केलेल्या ‘मंगळागौर’ कार्यक्रमात विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात दिसून येणार आहे. यामध्ये मंगळागौरीची पारंपारिक नृत्य, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद आनंद लुटता येणार आहे. तसेच यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फु बाई फु, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
तसेच या मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपारिक गायन आणि विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या महिलांना प्रथम पारितोषिक रु. 5001, द्वितीय पारितोषिक रु. 3001, तृतीय पारितोषिक रु. 2001 तसेच उत्तेजनार्थ 1001 अशी बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ‘लकी ड्रॉ’ च्या माध्यमातून भाग्यवान महिला विजेत्यांना पैठणी, नथ अशा विविध प्रकारची बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार असून मराठमोळ्या वेशभूषा महिलेला विशेष पैठणी देण्यात येणार आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी होणार असून सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी असे आ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळागौरीचा कार्यक्रम फक्त 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मर्यादित असून प्रवेश विनामुल्य आहे. कार्यक्रमातील नांव-नोंदणी तसेच महिला बचत गटांना स्टॉल (विनामूल्य) लावायचे असल्यास त्यांनी आरती राऊल (9967648091), मंदार म्हात्रे (9594030909) यांना संपर्क साधायचा आहे. नांव-नोंदणीसाठी अंतिम तारीख 25 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यावयाची आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai