Breaking News
राजन विचारे यांचा निवडणुक आयोगावर आरोप
ठाणे : ठाणे जिल्हा विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीबाबत राजन विचारे आणि केदार दिघे यांनी ईव्हीएम यंत्र तपासणी तसेच व्हीव्हीपॅटच्या बर्नट् मेमरी- मायक्रो कंट्रोलच्या तपासणीची मागणी केली होती. त्यासअनुसरुन 19 जुलै रोजी नवी मुंबईत ही तपासणी पार पडून ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सदर प्रक्रीया समाधानकारक पार पाडल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांच्या दाव्यावर राजन विचारे यांनी प्रश्नचिन्ह उभे करत सदर दावा पुर्णपणे खोटा असून भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व निवडणुक आयोगाने पडताळणीत फसवाफसवी केल्याचा आरोप केला आहे. पुन्हा एकदा विचारे यांच्या आरोपामुळे ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उमेदवार राजन विचारे व केदार दिघे यांनी ठाणे जिल्ह्यातील 147-कोपरी पाचपाखाडी आणि 148-ठाणे या विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक अनुक्रमे 305 आणि 68 मधील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या बर्नट् मेमरी- मायक्रो कंट्रोलच्या तपासणी आणि पडताळणीची मागणी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडे केली होती. ही पडताळणीची प्रक्रिया 19 जुलै रोजी केंद्रीय वखार महामंडळ, तुर्भे, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे. ही तपासणी प्रक्रिया अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या तपासणीसाठी डायग्नोस्टिक तपासणी आणि मॉक पोल असे दोन पर्याय होते. त्यापैकी डायग्नोस्टिक तपासणीचा पर्याय दोन्ही उमेदवारांनी निवडला होता. या तपासणीनंतर दोन्ही केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रे डायग्नोस्टिक तपासणीत योग्य असल्याचे आढळून आले तसेच उपस्थित अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी यांच्या शंकाचे निरसन भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नियुक्त अभियंत्यांनी केल्याचा दावा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केला होता. मात्र, हा दावा पुर्णपणे खोटा असल्याची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिली असून जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या बर्न मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणीची तांत्रिक प्रक्रिया कशापद्धतीने केली जाईल याची माहिती द्यावी अशी मागणी संबंधित उमेदवारांकडून करण्यात आली होती. परंतु ही माहिती शेवटपर्यंत देण्यात आली नाही उलट उपस्थित न राहिल्यास मॉक पोल घेऊन ईव्हीयम मधील माहिती डिलीट करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे ईव्हीएम मधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार डायग्नोस्टिक तपासणी हा पर्याय निवडून अर्ज भरून दिला. या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांनी आणि संबंधित भारत ईलेक्ट्रानिक्सचे अभियंते यांनी कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून प्रक्रिया बंद केली. त्याचवेळी ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक 68 वरील व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बॅटरी मिळाली, असा दावा राजन विचारे यांनी केला आहे. परंतु, जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी कोणतीही दखल न घेता सदर प्रक्रिया त्यांच्या मनमजने पार पाडल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे. ही बाब आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवू अशी प्रतिक्रिया त्यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai