Breaking News
बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोशी बलात्कारित आरोपींना गुजरात सरकारने त्यांच्या सद्वर्तनावरून मोकळे सोडले. या आरोपींवर बिल्किस बानो या मुस्लिम महिलेवर सामुहिक बलात्कार करणे, तिच्या 14 नातेवाईकांची निर्गुण हत्या करणे आणि बिल्किस बानोची बहिणी जी ओली बाळंतीण होती तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा मुंबई सीबीआय न्यायालयाने ठोठावली होती. त्यांच्या क्रौर्याची परिसीमा एवढी होती कि त्यांनी तिच्या तीन वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून ठार मारले. या आधुनिक कंसाना गुजरात सरकारने त्यांचे तुरुंगातील वर्तन चांगले असल्याचे सांगत मोकळे सोडले आहे. हे आरोपी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुजरातमध्ये काही ठिकाणी मिठाई वाटण्यात आली तर हिंदू विश्व परिषदेने हार घालून त्यांचा सत्कार केला. निर्दयतेने हत्या करणार्या व ओलेतीवर बलात्कार करणार्या नराधमांचे स्वागत जर समाज करणार असेल तर त्या समाजाचे भवितव्य काय याविषयी वेगळे सांगायला नको.
तीन वर्षाच्या लहान मुलीला दगडावर आपटून ठार मारणार्या कंसाची मुक्तता जन्माष्टमीच्या मुहूर्तावर गुजरात सरकार करते हाही योगायोगच. त्याबाबत प्रसारमाध्यमात आणि समाजात कोणतीही प्रतिक्रिया उमटत नाही हे हिंदुत्वाचे आधुनिक लक्षण असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या बहिणीच्या मुलापासून जिवाला धोका आहे हे कळल्यावर कंसाने बहिणीला कारागृहात टाकले व तिच्या सात बालकांना भिंतीवर आपटून ठार मारले असाच काहीसा प्रकार कथित गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये घडला. 2002 मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेला आग लावण्यात आली आणि त्यामध्ये कारसेवेतून परत येणारे 60 हिंदू भाविक मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीचा बिल्किस बानो हा भाग दोन होता. गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा रेल्वे जळीतकांडाचे पुढे काय झाले हाही प्रश्न पुलवामा हल्ल्यासारखाच अनुत्तरीतच आहे. आजही देशवासियांना त्या दोन्ही हल्ल्यामागे कोण होते याचे उत्तर मिळालेले नाही. परंतु गोध्रा हत्याकांडाचे आणि पुलवामा हत्याकांडाचे राजकीय भांडवल करून कोणी सत्ता मिळवली हे सांगण्यास कोणा भविष्यवेत्त्याची गरज आहे असे वाटत नाही.
गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना मोकळे सोडून पुन्हा या प्रकरणाची खपली काढली आहे. खरंतर एवढा मोठा आत्मघातकी धाडसी निर्णय घेण्याची राज्य सरकारला आवश्यकता नव्हती. परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी तसेच काहीसे या निर्णयाबाबत झाले आहे असे वाटते. देशात आपलीच सर्वकुश सत्ता असल्याच्या अभिनिवेशत सध्या मोदी वागत असून असेच अनेक चुकीचे निर्णय जनतेच्या माथी मारत आहेत. देशात बेरोजगारी, ढासळती भारतीय अर्थव्यवस्था व महागाईसारखे ज्वलंत प्रश्न सरकारला भेडसावत असतानाही सरकारकडून घर घर तिरंगा, वंदे मातरम सारख्या अनावश्यक प्रश्नांना सध्या हवा दिली जात आहे. या महत्त्वाच्या विषयांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी देशात निरनिराळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रसारमाध्यमातही अशा अनावश्यक विषयांवर चर्चा घडवून आणली जात असून मूळ मुद्द्यांना किंवा देशातील ज्वलंत मुद्दांना बगल देण्यात येत आहे. त्याच शृंखलेचा एक भाग म्हणून बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना मोकळे सोडण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला असेल. येत्या काही महिन्यात गुजरात, कर्नाटक, मध्य-प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने पुन्हा मतांच्या ध्रुवीकरणसाठी या प्रकरणाचा वापर होण्याची शक्यता आहे. हिंदू आरोपींना सोडले म्हणून विरोधक कशापद्धतीने विशिष्ट समाजाला पाठिंबा देत आहेत हे जनतेच्या मनावर बिंबवून पुन्हा सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्नही असेल असे म्हणण्यास येथे वाव आहे.
बिल्किस बानो प्रकरण जरी गुजरात सरकारने वेगळ्या उद्देशाने बाहेर काढले असले तरी विरोधकांनी त्याचा सकारात्मक वापर कसा करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. संपूर्ण व्यवस्था प्रतिकूल असताना एखादी अबला सतरा वर्ष एकाकी लढा देत अकरा आरोपींना शिक्षा देण्यास व्यवस्थेला भाग पाडते हेच या या प्रकरणाचे इस्पित आहे. आज सरकारने आरोपींना मोकळे सोडले म्हणून दंगा न करता विरोधकांनी न्यायालयीन लढाई लढावी. पण त्याचबरोबर जी हिम्मत बानो यांनी दाखवली तीच हिम्मत आज विरोधकांना दाखवण्याची गरज आहे. सरकार विरोधकाना संपवण्यासाठी ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा वापरत असताना या लढ्याकडे विरोधक कोणत्या नजरेतून पाहतात यावर लढ्याचा निर्णय ठरणार आहे. अनिर्बंध सत्ता ही राज्यकर्त्याला विनाशाकडे नेत असते हे सत्य आहे. कालच मोदी लॉबीने आपल्या वर्चवासाठी योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, शिवराजसिंग चौहान यांचे पंख कापले. त्याचे पडसाद 2024 च्या निवडणुकीत निश्चितच उमटतील ही काळया दगडावरची रेघ आहे. समोर घनघोर तिमिर असताना आपल्या अथक प्रयत्नाने यश कसे मिळवावे याचे बिल्किस बानो प्रकरण हे चांगले उदाहरण आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे अहंकार बाजूला ठेवून ही लढाई आता विरोधकांनी लढली पाहिजे. या प्रकरणाचा अनावश्यक बाऊ न करता उलट मोदींना धन्यवाद देऊन बानोचा लढा समोर ठेवून लढले पाहिजे. बिहारमधून नितीश कुमार यांनी पहिली चाल खेळली आहे, तिचे पडसाद मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणात उमटले आहेत. आता उर्वरित विरोधकांनी स्वतंत्र लढून आत्मघात करायचा कि एकत्र लढून लढा उभारायचा याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे. देशाला पुन्हा तिमिराकडून तेजाकडे नेण्यासाठी प्रयत्नांच्या समिधा सर्वानीच दिल्या पाहिजेत. त्यात सर्वच आले... एखादी बिल्किस पण...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे