Breaking News
उरण ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारने उलवे येथे दिबांच्या नावाने सुमारे 90 कोटी खर्चून उभारलेले भूमिपुत्र भवन मागील चार वर्षांपासून वापराविना धूळ खात पडून आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने भूमिपुत्र भवनाचे उद्घाटनही रखडले आहे. त्यामुळे सिडकोच्या अनागोंदी कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनंतर सिडकोकडून उलवे नोडमधील प्लाट क्रमांक आठ, सेक्टर 19 मध्ये 18, 500 चौमी क्षेत्रात भूमिपुत्र भवन उभारण्यात आले आहे. सुमारे 90 कोटी खर्चून दिवंगत दिबांच्या नावाने बहुउद्देशीय उभारलेली चार मजली अद्यावत इमारत मागील चार वर्षांपासून वापराविना धूळ खात पडून आहे. सिडकोने भूमिपुत्र भाडेतत्त्वावर देण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या होत्या. एका वर्षासाठी पाच कोटी रकमेच्या भरमसाट भाड्यामुळे निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी दर कमी करून भूमिपुत्र भवन चालवण्यासाठी देण्याची मागणी वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोकडे केली होती; मात्र सिडकोने ग्रामपंचायतीच्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. तसेच सिडको भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याने उद्घाटन रखडले आहे. दिवंगत दिबांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भूमिपुत्र भवनाच्या उद्घाटनासाठी सरकारकडे वेळ नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यात सत्ताधाऱ्यांनी चालढकल चालवली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai