Breaking News
शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतून साकारले छत्रपती शिवरायांचे गुणगान
नवी मुंबई ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी ‘जय जय महाराष्ट्र माझा' या कविवर्य राजा बढे लिखित ‘राज्यगीताचे' छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायासह समुहगान करण्यात आले. यावेळी चौकामध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आहे त्याच ठिकाणी स्तब्ध राहून राज्यगीताचा बहुमान राखला. अशाच प्रकारे नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून ॲम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनानंतर शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत शिवरायांना गीतनृत्यमय आदरांजली अर्पण केली. यामध्ये सुरूवातीलाच नेरुळ येथील विदयाभवन शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या काव्या कातळे या छोट्या मुलीने शिवचरित्रातील उल्लेखनीय प्रसंग सांगत प्रेरणादायी भाषण केले व उपस्थितांची दाद मिळवली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर शाळेतील शिक्षक विकास नाईक यांनी ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती' हे लोकप्रिय शौर्यगीत दमदार आवाजात सादर करुन वीररसाचा प्रत्यय दिला. त्याचप्रमाणे नमुंमपा शाळा क्रमांक 101 शिरवणे येथील 20 विदयार्थ्यांच्या समुहाने ‘शिवराज्याभिषेक सोहळा' सादर करुन शिवकाळ रंगमंचावर अवतीर्ण केला. शालेय विदयार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेला शिवरायांचा आदरभाव गीतनृत्य स्वरुपात सादर करुन शिवप्रभूंना आगळ्या वेगळ्या पध्दतीने मानवंदना अर्पण केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवजयंतीच्या उत्तरसंध्येला मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 रोजी सेक्टर 15, ऐरोली येथील महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने व इतर अनुषंगिक कार्यक्रम आयोजित करण्याची वैचारिक परंपरा जपत गतवर्षीप्रमाणेच पोवाडे आणि शाहिरी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. झी मराठी, स्टार प्रवाह तसेच इतर अनेक मनोरंजन चित्रवाहिन्यांवरुन आणि मोठ मोठया इव्हेंट व कार्यक्रमांतून गाजलेले शाहीर डॉ. देवानंद माळी आपल्या सहका-यांसह शाहिरीगान करणार असून छत्रपती शिवरायांच्या पोवाडयांसह इतर महामानवांनाही स्फुर्तीगीतांतून अभिवादन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाप्रसंगीही नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai