Breaking News
उरण : नवी मुंबई पालिकेच्या परिवहन सेवेने कोणतीही पूर्व सूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवन रेखा ठरलेली एनएमएमटी बस सेवा व्यवस्थापनाने बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उरण चारफाटा येथे धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे खोपटे बस अपघातातील मयत आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी खोपटे येथे बसने अपघात केला.यात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले होते. तेव्हा बस ड्रायवरला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. तसेच त्या वाहन चालक व ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता. या घटनेत ड्रायव्हर हा दारू पिऊन वाहन चालवत होता असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. अपघात झाल्यानंतर वाहन चालकाला मारहाण झाल्यानंतर एनएमएमटीच्या सर्व ड्रायव्हर कंडक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी संप सुद्धा केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत तसेच एन एम एम टी प्रशासनाने बसेसचे चालक व वाहक यांची सुरक्षा लक्षात घेता उरण मधील एनएमएमटीची सेवा बंद केली आहे. याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे प्रवाशांना आपलं निश्चित ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा एकदा धोकादायक खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला आहे. परिणामी वेळ आणि अधिकच्या खर्चाची भार आता उरणकरांच्या खिशावर पडत आहे. उरण मार्गावर दिवसभरात सुमारे 7000 हुन अधिक प्रवाशी प्रवास करतात. मात्र एनएमएमटीची सेवा बंद झाल्याने या सर्व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही सार्वजनिक सुविधा तातडीने सुरु करावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उरण चारफाटा येथे धरणे आंदोलन केले. या धरण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयु, जनवादी महिला संघटना, डीआयएफआय या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या धरण्याचे नेतृत्व माकपचे जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, हेमलता पाटील यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai