Breaking News
स्थानिक लेखा निधीच्या लेखा परिक्षणावर आक्षेप
नवी मुंबई ः पालिकेच्या आरोग्य विभागातील यांत्रिकी सफाई कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शासनाने विशेष लेखापरीक्षणाचे आदेश स्थानिक लेखा निधी संचालनालयाला दिले होते. संबंधित विभागाने सादर केलेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालावर तक्रारदार संजयकुमार सुर्वे यांनी आक्षेप घेत सदर अहवालाचे पुर्नलेखापरीक्षण राज्याच्या प्रधान लेखापालांनी(CAG) करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्याचे प्रधान महालेखापाल याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे पालिकेच्या आरोग्य विभागासह विशेष लेखा परीक्षण करणार्या स्थानिक लेखा निधी संचालनालयाचे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात यांत्रिकी पद्धतीने रुग्णालयीन साफसफाई करण्याच्या कामात घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी 2018 साली राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली होती. संबंधित घोटाळ्याची दखल घेत तत्कालीन नगरविकास प्रधानसचिव मनिषा म्हैसकर यांनी याबाबत विशेष लेखा परिक्षण करण्याचे आदेश स्थानिक लेखा निधी संचालनालयाला दिले होते. डिसेंबर 2020 मध्ये संबंधित विभागाने विशेष लेखापरीक्षण अहवाल नगरविकास विभागाला सादर केला होता. या अहवालातील आक्षेपांची दखल घेत शासनाने पालिकेच्या आरोग्य विभागातील तत्कालीन अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निविदाकाराने दिलेले दर हे प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्याने पालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान यामध्ये झाले नसल्याचे नमुद केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुर्वे यांनी विशेष लेखा परीक्षण अहवालातील या अभिप्रायावर आक्षेप घेत या कामात पालिकेला 27 कोटी रुपयांचे नुकसान कशाप्रकारे झाले आहे याचा कागदपत्रांसह विस्तृत अहवाल सादर करुन राज्याच्या महालेखापालांना या अहवालाचे पुर्नलेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत सुर्वे यांनी विशेष लेखा परिक्षण करणार्या स्थानिक लेखा निधी संचालनालयाच्या अधिकार्यांनी जाणीवपुर्वक पालिकेला झालेल्या नुकसानीची दखल घेतली नसल्याचे नमुद केले आहे. जर नुकसानीचा अभिप्राय अहवालात घेतला असता तर पालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असणारे तत्कालीन त्यांच्याच विभागाचे अधिकारी अडकणार होते. त्यामुळे संबंधित अहवालात फक्त पालिकेच्याच अधिकार्यांची विभागीय चौकशी करण्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. तक्रारदार सुर्वे यांनी ठेकेदाराला प्रशासकीय व सेवा शुल्क म्हणून 21.12 कोटी, रसायने व कन्झुमेबल्स न पुरवता 3.13 कोटी तर घसारा निधी म्हणून 1.24 कोटी रु. अतिरिक्त दिल्याने पालिकेचे 26 कोटी रुपये नुकसान झाल्याचा आरोप आपल्या तक्रारीत केला आहे. राज्याचे प्रधान लेखापाल या तक्रारीवर कोणते आदेश देतात याकडे पालिका अधिकार्यांसह विशेष लेखापरिक्षण केलेल्या संबंधित अधिकार्यांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai