Breaking News
नवी मुंबई ः भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर सर्वांनी आयुक्त महोदयांसमवेत सामुहिकरित्या ‘तिरंगा प्रतिज्ञा’ ग्रहण केली. यावष महानगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत मानांकन प्राप्त झाले असून यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रत्येक विभागातील स्वच्छतामित्र व स्वच्छतासखींचा विशेष सन्मान करण्यात आला.
मुख्यालयाच्या अंतर्गत दर्शनी भागात काढलेली ‘घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता’ ही आकर्षक रांगोळी आणि ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा झेंड्याच्या सेल्फी पॉईंटसोबत उपस्थित नागरिकांनी उत्साहाने छायाचित्रे काढली. याठिकाणी ठेवलेल्या तिरंगा कॅनव्हासवरही स्वाक्षरी करून नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात आपला सहभाग नोंदविला.
नमुंमपा मुख्यालय इमारतीला 14 ऑगस्टपासूनच नयनरम्य तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून त्यामुळे आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालय इमारतीच्या आकर्षणात भर पडलेली आहे. पावसाळी कालावधीत फडकविला न जाणारा मुख्यालय इमारती समोरील 225 फूट उंच व भव्यतम स्वरूपातील प्रतिकात्मक राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेच्या अनुषंगाने फडकविण्यात आला असून हे देखील नागरिकांचे एक विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने या परिसराला भेट देत राष्ट्रप्रेम जागवित आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्याने प्रवास करणारे अनेकजण याठिकाणी थांबून उंच राष्ट्रध्वज असलेली भव्य मुख्यालय इमारत तसेच रात्री तिरंगी रंगात उजळून निघालेल्या मुख्यालयासोबत अत्यंत आवडीने सेल्फी व छायाचित्रे काढत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai