Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबईतील ऐरोली येथे मंगळवारी ‘कॅपिटालँड डेटा सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सरकारने ‘डेटा सेंटर ऑपरेटर’ यांच्याबरोबर 20 हजार कोटी रुपयांच्या पुढील गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला. प्रस्तावित गुंतवणुकीत नवीन डेटा सेंटर, लॉजिस्टिक सुविधा आणि इतर संबंधित क्षेत्रांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, कॅपिटालँड इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर खैतानी, कॅपिटालँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड आणि टेमासेक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत नागपूर येथे 350 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी 700 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे रोजगाराच्या 3 हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित कंपनीला आवाहन केले आहे की, त्यांनी नागपूरमध्ये मेडिसिटी उभारावी. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “स्टेट ऑफ आर्ट” अशा प्रकारच्या कॅपिटालँडच्या डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न झालंय. ‘टेक्नॉलॉजी व्हाईस ॲडव्हान्स’ अशा प्रकारचे हे डेटा सेंटर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची कार्यक्षमता वाढविण्याकरिता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्येही ही क्षमता उभी राहणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, देशाची 60 टक्के डेटा सेंटर क्षमता एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलीय. आज महाराष्ट्र शासन आणि कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत सुमारे 19 हजार 200 कोटींची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट आणि महाराष्ट्रातील त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच या करारामुळे अंदाजे रोजगाराच्या थेट 60 हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत. या करारांतर्गत मुंबई आणि पुणे येथे बिझनेस पार्क्स, मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स, संपूर्ण महाराष्ट्रात लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्स हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच मेपल ट्री सोबत 3 हजार कोटींचा करार केला असून, त्या माध्यमातून ते आपल्याकडे काही लॉजिस्टिक पार्क्स तयार करणार आहेत. अतिशय महत्त्वाचे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी पूर्ण केले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या वेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिकेने निर्बंध लावल्यानंतर त्याचा फटका बसणाऱ्या उद्योगांना मदत करण्यासाठी उच्च स्तरिय समिती तयार केली असून, ही समिती त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन उद्याोगांना पर्यायी बाजारपेठ कोणती आहे, त्यांना कोणत्या प्रकारची मदत करावी लागेल अशा सर्व उपाययोजना सूचविणार आहे. त्याची अंमलबजावणी केली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग म्हणाले की, नवी मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र बनत आहे, आणि मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूरू यांसारख्या शहरांसोबत हे केंद्र भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करीत आहे. भारतात सध्या 800 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आणि मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम आहे. त्यामुळे, डेटा सेंटरची मागणी पुढील काळात झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातील डेटा सेंटरची क्षमता सध्याच्या 1.2 गिगा वॅटवरून 2030 पर्यंत 4.5 गिगा वॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या संधींमुळे सिंगापूर आणि भारत यांच्यातील संबंध अधिक मजबूत होत आहेत. या नवीन डेटा सेंटरच्या माध्यमातून उद्योगांना, स्टार्टअप्सना आणि उद्योजकांना डिजिटल युगात नवीन संधी शोधण्यासाठी मदत करेल आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योगदान देईल, असेही ते शेवटी म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai