Breaking News
वाहतूक प्रवण विभागात पालिकेची रहिवाशी बांधकाम परवानगी
नवी मुंबई ः नगरविकास विभागाने 23 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत सिवुड्स-दारावे रेल्वे स्थानकालगतचे क्षेत्र वाहतूक प्रवण झोन म्हणून दाखवले आहे. या वाहतूक झोनमध्ये महापालिकेने रहिवाशी बांधकामाची परवानगी दिल्याने शासनाने हा विभाग रहिवाशी विभागात समाविष्ट करण्यासाठी नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी सूचना व हरकतींपुर्वी सदर बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी पालिकेकडे केल्याने हा प्रकल्प पुन्हा वादात सापडला आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा 23 जुलै 2025 रोजी मंजुर केला आहे. हा विकास आराखडा मंजुर करताना 200 हून अधिक विकास आराखड्यातील प्रस्तावित सुधारणा शासनाने रोखून धरल्या आहेत. या सुधारणा नवी मुंबई महापालिकेने विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्रस्तावित केल्या होत्या. सदर प्रस्तावित सुधारणांवर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या गेल्या नसल्याने शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 30(1) अन्वये पुन्हा सुचना व हरकती मागवल्या आहेत.
शासनाने रोखून धरलेल्या 200 सुधारणा प्रस्तावांमध्ये नेरुळ सेक्टर 40 मध्ये एल ॲण्ड टी बांधत असलेल्या गृहप्रकल्पाचा समावेश आहे. हा गृहप्रकल्प वाहतुक प्रवण विभागात सिडकोने मंजुर केला असून त्यास नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम परवानगी दिली आहे. वाहतूक झोनमध्ये रहिवाशी वापर अनुज्ञेय नसतानाही सिडको व महापालिकेने दिलेल्या मंजुरीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून वराती मागून घोडे नाचवत नवी मुंबई महापालिकेने सीवूड्स-दारावे रेल्वे स्थानकाचे क्षेत्र आता रहिवाशी विभागात तबदील करण्याचा घाट घातला आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी हरकत घेत सदर सूचना व हरकती मागवण्यापुर्वी या वाहतूक झोनमध्ये सुरु असलेल्या बांधकाम परवानगी तातडीने थांबवण्याची मागणी पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. यापुर्वी या गृहप्रकल्पावर जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून ती प्रलंबित आहे. दरम्यान, विकास आराखड्याच्या प्रक्रियेत हे नवीन प्रकरण पुढे आल्याने सदर गृहप्रकल्प पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दरम्यान, सुर्वे यांच्या मागणीवर पालिका आयुक्त कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे