Breaking News
तब्बल 21 वर्षानंतर घडली मित्र-मैत्रिणींची भेट
मी शिक्षणासाठी श्री.धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर, सोनगांव या शाळेत 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेतले. 2003-04 या शैक्षणिक वर्षात आम्ही इयत्ता दहावीमध्ये होतो. या शाळेमध्ये शिकत असताना निरनिराळे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाशी आमचे स्नेहसंबंध जुळले. वर्गात शेजारी बसणारा मित्र, बेंचवरच्या खोडा, वर्गशिक्षक, शाळेचं विस्तीर्ण मैदान, समृध्द असा शिक्षक वर्ग असेलली वास्तू म्हणजे आमची शाळा. शाळेच्या सर्व आठवणी मनात घर करुन आहेत. एकत्र बसुन खाल्लेले डबे, बोर्डाच्या परीक्षा अन निकालाच्या दिवसाची भीती, बेंचवर मारलेल्या उड्या, हातावर खाल्लेल्या छडया, मैदानावर खेळलेले खो-खो, कबड्डीचे डाव, स्वत: चुक करून सराना सांगितलेले शेजाऱ्याचे नाव, तो शेवटचा निरोप समारंभाचा दिवस या साऱ्या गोड आठवल्या की नकळत डोळ्यात पाणी आणि गालावर हसू येते.
निरोप समारंभानंतर पुढे सगळी मुले निरनिराळ्या शहरात विखुरलेली. कोणी नोकरी, व्यवसायात गुंतलेले तर मुलींची लग्न झाली. मग काय? आम्ही सगळे मित्र एकत्र भेट होणं दुर्मिळचं. पण फेसबुक, इन्स्टा, व्हाटसअपच्या माध्यमातून अनेकवर्,ानंतर पुन्हा सगले जण एकमेकांच्या संपर्कात आले आणि जुन्या आठवणी नव्याने ताज्या करण्याची हूरहूर सगळ्यांना जाणवली. जो ग्रुप फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी होता, त्याला हलतं-बोलतं केलं. 10 ते 12 मित्रांची एकजूट बनली अन् स्नेह मेळाव्याची तयारी सुरु झाली. ग्रुपमध्ये नसलेल्या आणि दहावीमध्ये सर्वांसोबत जोडलेल्या मित्र-मैत्रिणींची शोध मोहिम सुरु झाली अन व्हॉट्सग्रुपला खऱ्या अर्थाने गती मिळाली. आमचे मित्र गणेश निंबाळकर, संदेश पवार, सचिन महामुलकर, राजकुमार दरेकर, भानुदास चिकणे आणि त्यांच्या मदतीला असणाऱ्या सगळ्यांनीच रात्रंदिवस प्रत्यक्ष हजर राहून चोख नियोजन केले. अखेर स्नेहमेळाव्याची तारीख ठरली आणि 17 ऑगस्ट 2025 हा दिवस उजाडला. सर्वांनी 9 वाजेपर्यंत आपल्या शाळेत हजर राहण्याचे फर्मान आमच्या नियोजन टीमने सोडले होते. सर्वांची धावपळ सुरु होती ती शाळेत पोहचण्याची. आपल्या मित्र मैत्रिणीला भेटण्याची. मग काय...सर्वजण शाळेत पोहचल्यावर काही ओळखीचे तर अनोळखी मित्र-मैत्रिणीची ओळख परेड सुरु झाली. गाठीभेटी घेण्यात सगळेच दंग झाले होते. थोडा गप्पा-गोष्टी रंगल्या. चहा नाष्टा झाला.
आम्ही सर्व विद्यार्थी बनून दहावीच्या वर्गात बसून त्या आठवणींना उजाळा दिला. शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांचे मनोगत झाले. त्यानंतर आमच्या तहसीलदार मित्रांनी फक्त लढ म्हणा... कविता सादर करुन लोहार सरांच्या आठवणी जाग्या करुन दिल्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आम्ही पिकॉक रिसॉर्टला जाण्याची वेळ झाली. शाळेतील नियोजनबध्द प्रोग्रॉम झाल्यानंतर आम्ही सगळे गाडांच्या मोठा फौजफाटा घेऊन रिसॉर्टच्या दिशेने रवाना झालो. आमच्या कमिटीने नियोजनामध्ये कसलीच कमी ठेवली नव्हती. रिसॉर्टवर पोहचल्यावर आम्हां सगळ्यांचे ड्रोन कॅमेऱ्यामधून शुटिंग, फोटोशूट, जंगी स्वागत करण्यात आले. रिसॉर्टवर गेल्यावर चहा नाष्टावर सर्वांनी ताव मारला. सगळे फ्रेश झाले. पुन्हा मित्र-मैत्रिणींची ओळख परेड सुरुच होती. ओळख झाल्यावर काही गप्पांमध्ये गुरफुटले तर काही फोटोशुटमध्ये गुंतले. पिकॉक रिसॉर्टचे लोकेशन मनाला भुरळ घालणारे होते. निसर्गाच्या सान्निध्यात गाणी, हास्यविनोद, आणि संवाद यांची रंगत खुलत गेली. दरम्यान, नियोजनामध्ये ठरल्यानुसार विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींसाठी खेळ पैठणीचा तर मुलांसाठी खेळ पोशाखाचा असा बहारदार कार्यक्रम झाला. मग सहभोजन झाले. काहींनी शाकाहारीतर काहींनी मांसाहारी जेवणावर ताव मारला.
आम्ही स्नेहमेळाव्याच्या शेवटाकडे आलो. सगळेचण आपली थोडक्यात माहिती देऊन मनोगत व्यक्त करत होते. त्यात आमचा शशिकांत पुन्हा जुन्या आठवणीत रमला अन सगळ्यांना भावूक केलं ना राव त्याने. मग त्याला शांत करुन तहसीलदार सचिन सर उठले. त्यांनी खडतर प्रवासाचे वर्णन करताना आलेली संकटे, त्यावर केलेली मात अन् त्यातून मिळालेलं यश याबद्दल सांगितले. अन सगळ्या मित्र-मैत्रिणींना आवाहन केले की कोणाला कशाचीही गरज असूद्या सर्वात पुढे मी असेन... उपस्थित मित्रांच्या आग्रहास्तव आमचा गायक संतोष हिरवेंनी शानदार गाण्याने या गेट टुगेदरची शोभा वाढवली. अन सगळ्यांना थोडं फ्रेश केल. दिवस संपत आला अंधार पडण्याची वेळ जवळ आली आहे असे असताना पुन्हा पुढच्या वर्षी असेच नियोजन करण्याचे काम नियोजन कमिटीकडे सोपवण्यात आले. मग ठरलं. पुढे आमच्या नियोजन कमिटीने उपस्थित असलेल्या सर्वांना आठवण भेट म्हणून ट्रॉफीचे वाटप केले.
गाण्यांची सोय, कार्यक्रमाचे सादरीकरण आणि व्यवस्थापन अतिशय सुरळीत आणि कौतुकास्पद होते. नियोजनकर्त्यांनी प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता राखली, त्यासाठी त्यांचे सर्वांनी मनापासून अभिनंदन केले. चहा....गरमा गरमा कांदा भजीने कार्यक्रमाची सांगता करत पुढच्या भेटीचं एकमेकांना आश्वासन देत सगळ्या मित्र-मैत्रिणींनी हस्तांदोलन करत निरोप घेतला.
-किरण गायकवाड,मु. मानकरवाडी, जि. सातारा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai