Breaking News
नवी मुंबई ः दिवसेंदिवस सिमेंट, स्टील आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. पालिकेने निविदेमधून प्राईज व्हेरिएशन अट काढल्यामुळे वाढत्या महागाईचा फरक ठेेकेदारांना मिळत नसल्याने ठेकेदार मेटाकुटीला आले आहेत. वाढीव दरातील फरक मिळत नसल्याने अनेक ठेकेदारांनी काम बंद करण्याच्या कायदेशीर नोटीसा दिल्याने त्याचा फटका पालिकेच्या विकास कामांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालिका आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे ठेकेदारांचे लक्ष लागले आहे.
पालिकेने सध्या शेकडो कोटींची कामे हाती घेतली असून त्यामध्ये नेरुळ येथील 150 कोटींचे सायन्स सेंटर, 165 कोटींचे वाशी बस डेपोत बांधण्यात येणारे वाणिज्य संकुल, ऐरोली येथील 60 कोटींचे नाट्यगृह, 450 कोटींचा वाशी ते कोपरी उड्डाणपुल यासारख्या महत्वाच्या कामांचा समावेश आहे. त्याचबरोबर नेरुळ येथील 100 कोटींचे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वंडरपार्कचे 27 कोटींचे नुतनीकरण तसेच अनेक विभागात सुरु असलेली पावसाळी गटारांचे बांधकाम, शाळेच्या इमारतींचे वाढीव बांधकाम यासारखी कामे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागात सुरु आहेत. काही कामांचे कार्यादेश कोरोनापुर्व काळात देण्यात आले असून ही कामे पुर्ण होण्यास दिड ते दोन वर्षांचा विलंब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार एक वर्षाखालील पुर्णत्वाच्या कालावधीस प्राईज व्हेरिएशन अट घालण्यात येत नाही. परंतु, ज्या कामांचा पुर्णत्वाचा कालावधी एक वर्षाहुन अधिक असतो त्या निविदांमध्ये ही अट घातली जाते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने बहुतांश कामांचा पुर्णत्वाचा कालावधी एक वर्षाहुन कमी ठेवल्याने ही अट निविदेत टाकली नाही त्यामुळे त्याचा फटका ठेकेदारांना बसला आहे.
ठेकेदारांनी निविदा भरल्या त्यावेळी बाजारात सिमेंटचा भाव रु.250-300 च्या घरात होता. परंतु, आज हा भाव रु. 450 प्रति पोते आहे. तसेच लोखंडाचा भाव प्रति किलो रु. 25-30 दराने वाढल्याने ठेकेदारांचे गणित पुरते कोलमडले आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे भाव दररोज वाढत असल्याने डांबर, खडी, रेती व इतर बांधकाम साहित्यांच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. यामुळे आज ठेकेदारांना खिशातून पैसे घालून कामे करावी लागत असल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक ठेकेदारांनी याबाबत पालिका आयुक्त व शहर अभियंता यांना पत्र देवून प्राईज व्हेरिएशन अटीनुसार बाजार भावातील फरक देण्याची विनंती करुनही अजूनपर्यंत पालिकेने याबाबत कोणतीही भुमिका घेतली नसल्याने अनेक ठेकेदारांनी काम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. काही ठेकेदारांनी याबाबत पालिकेला नोटीसाही दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेतात यावरच पालिकेच्या विकास कामांचे भवितव्य अवलंबून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे