Breaking News
पाच वर्षात अहवालावर निर्णय घेतला नसल्याचे गगराणींचे शपथपत्र
नवी मुंबई ः विकासकांना बांधकाम परवानगी देताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा ठपका संचालक नगर रचना पुणे यांनी आपल्या अहवालात ठेवला होता. या अहवालाची दखल घेऊन सरकारने संबंधित विभागातील अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश सिडकोला दिले होते. नगरविकास विभागाच्या अभिप्रायासह सिडकोचा अहवाल पाच वर्षांपूर्वीच सरकारला सादर केला असून त्यावर गेली पाच वर्ष कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याचा धक्कादायक खुलासा नगरविकास प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी शपथपत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केल्याने खळबळ माजली आहे. गगराणींच्या या शपथ पत्रावर आता सरकार आणि न्यायालय कोणता निर्णय घेते यावर अधिकार्यांचे भवितव्य निश्चित होणार असल्याची चर्चा सिडकोत आहे.
सिडकोने 2006 मध्ये फ्लॉवर बेड, कपाटे आणि पॉकेट टेरेस या माध्यमातून मोफत चटई निर्देशांक विकासकांना देण्याची सुधारणा आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत केली होती. ही सुधारणा सिडकोने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवली होती. सिडकोच्या बांधकाम परवानगी विभागाने या सुधारणांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत न राहता सरसकट बांधकाम परवानग्या विकासकांना देणे सुरू केले. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी शासनाकडे केल्यानंतर त्याबाबतचा विस्तृत अहवाल संचालक नगर रचना पुणे यांचेकडून मागवण्यात आला. संचालकांनी नगरविकास विभागाला सादर केलेल्या अहवालात सिडकोच्या अधिकार्यांनी नियमबाह्यपणे बांधकाम परवानग्या दिल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सरकारने कोणताही निर्णय या अहवालावर न घेतल्याने सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिका दाखल केल्यानंतर शासनाने 3 ऑगस्ट 2017 रोजी सिडकोच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांना या अनियमिततेस जबाबदार असणार्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले होते. परंतु तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी याबाबत कोणतीही कारवाई न करता ज्या प्रस्तावांना यापुर्वीच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे ती तशीच कायम ठेवून त्यास भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसेच सिडकोने घेतलेला हा निर्णय कशापद्धतीने रास्त आहे याचा अहवाल शासनाला सादर केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने 8 फेब्रुवारी 2019 रोजी सिडकोने 2006 मध्ये सादर केलेल्या प्रस्तावावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सिडकोच्या अधिकार्यांनी सादर केलेल्या अहवालावर सरकार कोणता निर्णय किंवा आदेश देणार आहे याबाबत सविस्तर खुलासा करण्यास सरकारी वकीलांना सांगण्यात आले होते. सरकारने याबाबत कोणताही खुलासा न केल्याने 4 एप्रिल 2022 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नगर विकास प्रधान सचिव यांना सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी 13 एप्रिल रोजी शपथपत्र दाखल करून त्यात नगरविकास विभागाची भूमिका स्पष्ट केली आहे. सिडकोच्या क्षेत्रासाठी नवीन विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी 2 डिसेंबर 2021 पासून सुरू झाल्याने सिडकोच्या जुन्या प्रस्तावाचा विचार करण्याची गरज नसल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर सिडकोच्या अधिकार्यांनी सादर केलेल्या अहवालावर नगर विकास विभागाने आपल्या अभिप्रायासह अहवाल शासनाच्या आदेशासाठी सादर केल्याचे सांगितले आहे.
गगराणी यांनी आपल्या शपथपत्राने सिडको अधिकारी आणि विकासक यांना उघड्यावर पाडले आहे. सिडकोने पाठवलेला प्रस्ताव आता अनावश्यक झाल्याचे शपथपत्रात नमूद केल्याने फ्लॉवर बेड, कपाटे आणि पॉकेट टेरेस या माध्यमातून लाखो चौरस मीटरचा मोफत चटई क्षेत्र सिडकोने विकासकांना बहाल केला असून त्यावर शासन कोणता निर्णय देते याकडे विकासकांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बांधकाम परवानगी देताना मोफत चटई क्षेत्राच्या खिरापतीसह गंभीर अनियमितता करून विकासकांना फायदा देणार्या अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत सरकार कोणती भूमिका घेते याकडे सिडको अधिकार्यांचे लक्ष लागले आहे. सदर महत्वाचा प्रस्ताव शासनाकडे गेली पाच वर्षे विना आदेशाने पडून असल्याने आणि शासनाच्या निष्क्रियतेने फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांबाबत न्यायालय कोणता निर्णय देते यावर विकासकांसह अधिकार्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
सिडको अधिकारी, विकासक आणि वास्तुविशारद यांच्या अभद्रयुतीने हजारो कोटींचा चुना नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात घर घेतलेल्या ग्राहकांना लावला आहे. हे ग्राहकांचे नुकसान संबंधित विकासक, अधिकारी यांचेकडून वसूल होऊन ते शासनाच्या तिजोरीत जमा होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबधित वास्तुविशारदांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे