Breaking News
‘विपुल’ दडपणाने 361 कोटींच्या कामासाठी आयुक्तांचे ‘कदम’
नवी मुंबई ः पामबीच मार्गावर महात्मा फुले जंक्शन ते कोपरी पर्यंत बांधण्यात येणारा उड्डाणपुल वादात सापडला आहे. पोलीसांच्या वाहतुक विभागाचा अभिप्राय डावलून 361 कोटी रुपयांचा पुल बांधण्याचा घेतलेला निर्णय आयुक्त अभिजीत बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणेदाराकडून ‘विपुल’ दडपण आल्याने हे अनावश्यक ‘कदम’ आयुक्तांनी उचलल्याने नवी मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाकडे तक्रार करुन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्याची तयारी अनेक संघटनांनी सुरु केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने महात्मा फुले जंक्शन ते कोपरी पर्यंत 361 कोटींचा पुल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सुरुवातीला कोपरी जंक्शन जवळील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी छोटा उड्डाणपुल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा पालिकेचा मनसुबा होता. परंतु, तत्कालीन शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी त्यांना मुदतवाढ मिळेल या आशेने ठाणेकरांना खुश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून त्याची आवश्यकता होती का? असा सवाल आता विचारला जावू लागला आहे.
पामबीच मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी या पुलाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी या मार्गावर गेल्या 15 वर्षात कधीही वाहतुक कोंडी झाली नसल्याचा अनुभव नवी मुंबईकरांचा आहे. या पुलाऐवजी घणसोली ते ऐरोली हे काम प्राधान्याने हाती घेतल्यास ठाणे-बेलापुर मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होईल जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होईल अशी मागणी असताना शहर अभियंता विभागाने हाती घेतलेल्या या कामाच्या गौडबंगालाची चर्चा सर्वत्र आहे.
राज्यातील एका मंत्र्यांच्या मुलाच्या मेहुण्याला हे काम मिळावे म्हणून पालिका आयुक्त व शहर अभियंता यांच्यावर विपुल दबाव टाकल्याने हे कदम उचलले गेल्याची चर्चा आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी 384 झाडांचे पुर्नेरोपण करण्याचा प्रस्ताव प्रसिद्ध झाल्याने नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. समाज माध्यमांवर याबाबत जनजागृतीसाठी अनेक संदेश फिरत असून याबाबत आंदोलन उभे करण्याची तयारी नवी मुंबईत सुरु झाली आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी झाडांच्या संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी सुरु केली आहे. पर्यावरण मंत्री याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai