Breaking News
मुंबई : मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून हल्ला करणाऱ्या एका 40 वर्षीय आरोपीला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवत एकाच प्रकारच्या चार गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 10 वर्षांच्या सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली आहे. आपल्या या कृतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येईल, याची आरोपीला पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही त्यानं लोकलवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून मारण्यासारखं कृत्य केले. अशा समाजकंटकांना शिक्षा ठोठावून समाजात योग्य तो संदेश पोहोचवणं गरजेचं आहे, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी आपल्या निकालात नोंदवत हत्येच्या आरोपाखाली आरोपीला ही शिक्षा ठोठावली आहे.
कुर्ला आणि विद्यविहार स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर 40 वर्षीय राकेश रॉडनं 16 जुलै 2019 रोजी एकच दिवशी तीनदा दगडफेक केली होती. त्यामध्ये कुर्ला ते विद्याविहार दरम्यान दुपारी प्रवास करणारे रतनदीप चंदनशिवे प्रथम लक्ष्य झाले. ज्यात त्यांच्या डाव्या कोपराला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर टिटवाळास्थित अजय कहार (23) हा तरूण गोवंडीहून कुर्लामार्गे घरी परतत असताना राकेशनं केलेल्या दगडफेकीमुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर 32 वर्षीय तौसिफ खान हा सायंकाळी पनवेलच्या दिशेनं प्रवास करत असताना राकेशनं अचानक फेकलेल्या सळईचा मार थेट त्याच्या पोटात बसला होता. या घटनेत जखमी झालेल्या दोघांच्या डोक्याला टाके घालावे लागले होते. याशिवाय एका विद्यार्थ्यानं या हल्ल्यात स्मरणशक्ती गमावल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यांनतर राकेश रॉडला लगेचच अटक करण्यात आली, तेव्हापासून तो कारागृहातच आहे.
आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचंही आरोपीनं एकदा कोर्टात सांगितले होतं. मात्र, वैद्यकीय चाचण्यांवरून त्याच्या मानसिकतेत कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. आरोपी हा कुटुंबासाठी एकटा कमावणारा असल्याची बाब वगळता त्याला शिक्षेत दया दाखवावी असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही किंबहुना त्यानं केलेला गुन्हा समाजाच्यादृष्टीनं धोकादायक आहे. तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाय आरोपीच्या कृत्यामुळे जखमी झालेल्यांचे जीवन आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे. तर दुसरीकडे, रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता असल्यानं जनतेनंच त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. समाजातील अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणं आवश्यक असल्याचं नमूद करत मुंबई सत्र न्यायालयानं रेल्वे कायद्याच्या कलम 152 (रेल्वेने प्रवास करणार्यांना दुखापत किंवा इजा करणे) अंतर्गत देखील आरोपीला दोषी ठरवून 10 वर्षांच्या सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai