Breaking News
दोन चोरांना अटक ; 12 रिक्षा हस्तगत
नवी मुंबई : नवी मुंबईतून रिक्षा चोरून थेट जालना जिल्ह्यात विक्री करणाऱ्या दोन चोरांना सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांनी वेगवेगळ्या भागांतील 12 रिक्षा चोरुन त्यांचे नंबर प्लेट, चेसीस नंबर बदलून त्यांची विक्री केली. घटनास्थळ व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी दोघांना अटक करुन सर्व रिक्षा जप्त केल्या आहेत.
सीबीडी सेक्टर-11 भागातून 28 मे रोजी एक रिक्षा चोरीला गेली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीडी पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक संदेश रेवले, निरीक्षक (गुन्हे) अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश डांबरे, उपनिरीक्षक विष्णू वाघ व त्यांच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील सुमारे 60 ते 65 सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयित आढळले. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून नाजिमोद्दीन काझी (43) याला जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक केली. पोलिसांनी काझी याची सखोल चौकशी केली असता, त्याने साकीब शेख (24) याच्यासोबत जालना येथून नवी मुंबईत येऊन सीबीडी, खारघर, कळंबोली व पनवेल या परिसरातून एकूण 12 रिक्षा चोरून नेल्याची माहिती दिली. तसेच रिक्षांवरील नंबर तसेच चेसीस नंबर बदलून त्यांची विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी साकीब शेख यालाही अटक केली आहे. या गुह्यातील रिक्षांचे आरटीओ नोंदणी क्रमांक, इंजिन नंबर, चेसीस नंबर मिटवल्याने ओळख पटविणे अत्यंत जिकीरीचे होते. मात्र सीबीडी पोलिसांनी रिक्षांची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मयुर भुजबळ यांनी दिली.
परतूर, मंठा, हिंगोलीतून हस्तगत सीबीडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील-3, खारघर आणि कळंबोलीतील प्रत्येकी 4 तर पनवेल शहर पोलिस ठाणे क्षेत्रात 1 असे 12 रिक्षा या दोघांनी चोरल्या होत्या. चोरी केलेल्या रिक्षा जालन्यातील परतूर, मंठा, तसेच हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणांहून हस्तगत करण्यात आल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai