Breaking News
आंदोलनामुळे मुंबईत जाम ; नागरिकांमध्ये घबराहट
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानात शासनाच्या मंजुरीनंतर आमरण उपोषण सुरु केले आहे. पोलीसांनी फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, परंरतु दिवसअखेर ही मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी जर आंदोलकांनी माघार घेतली नाही तर काय? या प्रश्नाने मुंबईकरांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आंदोलनाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल नागरिकांना पडला असून त्यामुळे सरकारच्याच मनसुब्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
जरांगे-पाटील यांनी ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मराठा आंदोलनाची हाक दिल्याने त्यांच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. महाराष्ट्र सरकार निदान हे आंदोलन गणेशोत्सव संपेपर्यंत तरी पुढे ढकलेल अशी अपेक्षा सर्वसाधारण नागरिकांना होती. परंतु, सरकारनेच जरांगेंना आणि आंदोलनातील समर्थकांना मुंबईत एक दिवसाचे आंदोलन करण्याची परवानगी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय सुरु आहे याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. त्यातच पुन्हा एकदा एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने मुंबईत चाकरमान्यांसह वाहतुकीचे बोजवारा उडाल्याने प्रचंड संतापाची लाट सरकारविरुद्ध पसरली आहे. आंदोलनाविरुद्ध जनमत उभे करण्याची सरकारची रणनिती आता सरकारच्याच अंगलट आल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.
यापुर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत मनोज जरांगे यांना थोपवले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर 27 तारखेपासून जालन्यातील अंतरलवाली सराट्यातून निघालेला भव्य मोर्चा शुक्रवारी सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. दरम्यान, उपोषणस्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असंही जरांगे म्हणाले. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला. शनिवारी आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनास एकदिवसाच्या मुदतवाढीची परवानगी पोलीसांकडून देण्यात आली असून काही नियम व अटी त्यात आहेत. आंदोलनात निदर्शकांची संख्या 5 हजार पेक्षा जास्त नसावी अशीही अट घालण्यात आली आहे. तरीही, राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईत पोहोचू लागले आहेत आणि वातावरण आधीच तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. कारण हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो.
जरांगे पाटलांनी शनिवारी माघार घेतली नाही तर मुंबईत सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सर्व खापर पोलीसांवर फोडून हे आंदोलन मोडून काढण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहणार नाही. सरकारने जर आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम राज्यभरात उमटतील याची कल्पना सरकारला असेल असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता संपुर्ण लक्ष राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाकडे लागले असून आंदोलन चिघळू नये अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai