सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला ओवळे ग्रामस्थांचा विरोध

पनवेल : सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शुक्रवार, 19 जुलै रोजी मोठा पोलिस बंदोबस्त आणि सिडकोच्या सुरक्षा रक्षकांच्या फौज फाट्यासह बुलडोझर, पोकलेनसह ओवळे येथे कारवाई करण्याचा प्रयत्न केला. यावेळी केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी केवळ रिक्त शाळेवर कारवाई करणार आहोत असे सिडको अधिकार्‍यांचे म्हणणे होते, परंतु त्या कारवाईच्या आड येथील तीन पात्र घरे देखील तोडण्याचा सिडकोचा मनसुबा असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुलडोझर समोर ठिय्या देत अतिक्रमण विरोधी पथकाला रोखले.

पावसाळ्यात अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई न करण्याचे आदेश असताना सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी कारवाई कशी करतात असा प्रश्न उपस्थित ग्रामस्थानंनी केला? सिडको येथील प्रकल्पग्रस्तांना आश्वासनं खेरीज दुसरे काहीही देत नाही. येथील पात्र घरांना पुनर्वसनाचे बाबत कुठलीही माहिती न देता त्यांना घिसाडघाईने घराबाहेर काढणे उचित होणार नाही. आम्ही अथवा येथील कुठलाही प्रकल्पग्रस्त बांधव हा सरकारच्या प्रकल्पाच्या अजिबात विरोधात नाही हे सर्वप्रथम मी स्पष्ट करतो. परंतु राष्ट्रहितासाठी एखादा प्रकल्प निर्माण होत असेल आणि त्यासाठी आमचे बांधव जमिनी देत असतील तर त्यांना त्यांचे योग्य पुनर्वसन मूल्य प्राप्त झाले पाहिजे असे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.