Breaking News
नवी मुंबई ः शहरातील पायाभूत सुविधा, सेवासुविधांची पूर्तता आणि घनकचरा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण पद्धती अशा विविध बाबींची सविस्तर माहिती घेण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आज नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यास भेट दिली. यामध्ये त्यांनी नवी मुंबईची शहराची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण जाणून घेतले तसेच भविष्यातील संभाव्य विकास प्रक्रियेची माहिती घेतली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित आशियाई विकास बँकेचे नगरविकास तज्ज्ञ पॅट्रिक लवेरी, प्रकल्प विश्लेषक लिंडी लोइस एम. गॅमोलो, वरिष्ठ अधिकारी अंकित व मिनाक्षी अजमेरा तसेच केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे एनपीएमयू सल्लागार राहुल सिंग व यूडब्ल्यूएम तज्ज्ञ प्रशांत महापात्रा यांचे महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व स्मिता काळे, अति.शहर अभियंताअरविंद शिंदे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहराची वैशिष्ट्ये, शहर सेवा, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील रोडमॅप यावर विस्तृत माहितीपूर्ण सादरीकरण केले. यावेळी शिष्टमंडळातील वरिष्ठ अधिकारी यांनी शहरातील आव्हाने, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत शहरी विकासासाठीच्या धोरणांविषयी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीचा एक भाग म्हणून, शिष्टमंडळाने घनकचरा व्यवस्थापनावर दैनंदिन निरीक्षण व नियंत्रण ठेवणा-या महापालिका मुख्यालयातील एकात्मिक नियंत्रण कक्षाला (इंटिग्रेटेड कमांड अँड कन्ट्रोल सेंटर) भेट देत तेथील कार्यप्रणाली जाणून घेतली व समाधान व्यक्त केले. या अभ्यास दौऱ्यात नवी मुंबई पालिकेच्या वतीने, केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या सहयोगाने, सीबीडी बेलापूर येथे कार्यान्वित देशातील पहिल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प (टीआरएफ) केंद्राला भेट देऊन तेथील कामाची पाहणी करण्यात आली.
तसेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणारे नेरूळ येथील वंडर्स पार्क, कोपरखैरणे सेक्टर 14 येथील जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याठिकाणी फुलविलेले निसर्गोद्यान व तेथे मियावाकी स्वरूपात विकसित केलेले शहरी जंगल, त्या परिसरातील टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेतून निर्माण केलेले आकांक्षी शौचालय तसेच सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारे अत्याधुनिक टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट अशा अभिनव प्रकल्पांना अभ्यासगटाने भेट देली व अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या कार्यपध्दतीची प्रशंसा केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai