Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी बुधवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. काही अधिकार्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर काही अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. तसेच त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे लांडगे यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर रिक्त झालेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजय कादबाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांचा देखील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने काशिनाथ चव्हाण यांची देखील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या तळोजा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी जितेंद्र सोनावणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी विषेश शाखेतील पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होऊन पुर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai