पस्परांतील स्नेह वाढवणारी मकर संक्रांत
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 15, 2024
- 384
असे म्हणतात प्रेमाने जग जिंकता येते. जिथे सर्व शस्त्रांचा प्रभाव संपतो तिथे प्रेमाचे शस्त्र कामी येते. श्रीकृष्णानेही गीतेमध्ये प्रेमाची महती वर्णिली आहे. आपल्या संपूर्ण अवतारकार्यातही भगवंताने प्रेमाचे महत्व आपल्या वर्तणुकीतून प्रसंगांतून दाखवून दिले आहे. भारतीय हिंदू संस्कृतीने तर प्राणिमात्रापासून अगदी निर्जीव वस्तुवरही प्रेम करायला शिकवले आहे. अशा या प्रेमाची शिकवण देणारा वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळाच्या माध्यमातून प्रेमाची देवाणघेवाण करण्यास शिकविणारी मकरसंक्रांत भारतीय संस्कृतीचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच सूर्याचे उत्तरायण सुरु होते. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. शरपंजरी पहुडलेल्या पितामह भीष्मांनीही प्राण त्यागण्यासाठी उत्तरायण सुरु होण्याची वाट पाहिली होती. हिंदू धर्मातील हा एकमेव सण आहे जो शालिवाहन वर्षानुसार साजरा न करता सौर कालगणनेनुसार साजरा केला जातो.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या सणाला शेतीविषयक महत्वही आहे. आपल्या शेतात आलेले धान्य या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकींना वाण म्हणून देतात. याचेच रूपांतर आता हळदी कुंकू समारंभात झाले असून शहरी भागांत स्त्रिया वेगवेगळ्या वस्तू वाण म्हणून देतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना तिळगुळाच्या लाडूप्रमाणे प्रेमाच्या नात्यात घट्ट बांधण्याची प्रेरणा देणारा हा सण स्नेहाचे आणि प्रेमाचे आगळे महत्व सांगून जातो. एकमेकांना तिळगुळ देताना 'आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका' असे बजावून वर्षभर परस्परांशी स्नेहाने वागण्याचा जणू करारच या दिवशी केला जातो. आमच्या लहानपणी मोठ्यांना तिळगुळ देऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेताना पाठीवर पडणारी थाप आम्हा बच्चे कंपनीला वेगळाच आनंद देऊन जाई. तिळगुळ वाटूनही तिळगुळाची वाटी द्रौपदीच्या थालीप्रमाणे भरलेलीच असे. कारण जेव्हढे तिळगुळ दिले जायचे तेव्हढेच पुन्हा वाटीत यायचे. तिळगुळ वाटण्याच्या निमित्ताने जेष्ठ मंडळींकडून होणारे लाड आणि मिळणारे आशीर्वाद आम्हाला ऊर्जा देत असत.
तीळ हे स्निग्ध असतात. स्निग्ध म्हणजेच स्नेह. या स्नेहाचे गुळासोबत मिश्रण करून ते घट्ट केले जाते. एकमेकांतील स्नेहाचे नाते असेच घट्ट राहावे यासाठीच मकर संक्रातीच्या दिवशी प्रतीकात्मक तिळगुळ एकमेकांना दिला जातो. तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत शरिरातील उष्णता वाढवण्याचे महत्वाचे कार्य करतात त्यासोबत मिश्र केलेला गुळ स्नेहाच्या नात्यातील गोडवा दिवसागणिक वाढत जाण्याची प्रेरणा देतो. मकर संक्रांतीनंतर रथ सप्तमीपर्यंत स्त्रिया घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी हळदी कुंकू साजरा करतात. एरव्ही एकमेकांशी भांडणाऱ्या, एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या स्त्रिया वर्षभरातील सारे हेवेदावे विसरून हळदी कुंकू साजरा करण्यासाठी एकत्र येतात. एकमेकींना हळद कुंकू लावून पस्परांतील शक्तीचे पूजन करतात. प्रेमाचे प्रतीक म्हणून तिळगुळासोबत वाण देतात. मकर संक्रांत हा सण भारताच्या विविध प्रातांसह नेपाळमध्येही उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी सण साजरा करण्याच्या पद्धती जरी भिन्न असल्या तरी एकमेकांमध्ये प्रेमाची देवाणघेवाण करणे हाच या सणाचा प्रमुख उद्देश आहे. सध्याच्या धावत्या जगात आपल्या पाल्याचा निभाव लागावा यासाठी पालक आपल्या पाल्यांना इंग्रही माध्यमांच्या किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये घालू लागली आहेत. कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या आजच्या पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. प्रेम व्यक्त करण्याचे दिवस आणि साधनेही आज बदलली आहेत. परंपरागत सणांची जागा आज निरनिराळ्या 'डेज'ने घेतली आहे. हातभर रिबिनी बांधून आणि अंगावर पेनाने रंगवून, चॉकलेट आणि गुलाबाची फुले वाटून प्रेम दर्शवणारी नवीन पिढी सर्वत्र पाहायला मिळते आहे. ज्या पिढीमध्ये जेष्ठांसाठी केवळ 'मदर्स डे' आणि 'फादर्स डे' तेव्हढे शिल्लक राहिले आहेत. अशा पिढीला मकरसंक्रांतीतील तिळगुळाचा गोडवा कदाचित कळणारही नाही. त्यांच्यावर आपल्या सणांचे आणि संस्कृतीचे महत्व बिंबवणे आज आवश्यक बनले आहे.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai