Breaking News
नाट्यगृह सुट्टीच्या दिवशी सवलतीत उपलब्ध करुन देण्याची मागणी
नवी मुंबई ः मनोरंजन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र विविध भुमिका साकारुन मनोरंजन करणारा, सामाजिक प्रबोधन करणारा कलाकार आजही उपेक्षित राहिला आहे. पावलोपावली त्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे बालरंगभूमी अधिक समृद्ध होण्याची गरज आहे. नवी मुंबईतील बालरंगभूमीला व बालकलाकारांना आपली कला, संस्कृती जोपसण्यासाठी पालिकेने प्रोत्साहन द्यावे अशी विनंती नवी मुंबई भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ - प्रभारी सुनील पगार यांनी पालिका आयुक्तांना केली आहे. बालनाट्य संस्थांना रविवार - सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नाट्यगृह उपलब्ध व्हावे व भाड्यात अनामत रक्कमेत 50% सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी निवदेनातून केली आहे.
नवी मुंबईतील अधिकाधिक नाट्य संस्था प्रायोगिक तत्वावर आणि स्पर्धात्मक स्वरूपात कार्यरत आहेत. एकांकिका स्पर्धा, महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धा, महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नवी मुंबईतील रंगकर्मी आपली कला जोपासत नवी मुंबईतील नाट्य संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. बालरंगभूमी मुलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. जिथे मुले आत्मविश्वास आणि सामाजिक जाणिव विकसीत करु शकतात. सुदैवाने नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे नाट्यगृह असल्याने येथील कलाकारांना अधिक संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र त्याला पालिकेने सहकार्य केले प्रोत्साहन दिले तर कलाकारांना त्याचा फायदा होईल. याच अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक, ठाणे लोकसभा मा.खासदार डॉ. संजीव नाईक, न.मुं.म.पा मा.स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष अभिनेत्री मेघा धाडे, राहुल वैद्य आणि कोकण विभाग संयोजिका अक्षयाताई चितळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई, प्रभारी - सुनील रमेश पगार, भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ नवी मुंबई जिल्हा कार्यकारणी सदस्य - प्रथमेश चोरघे व स्वप्नील राऊत यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन नवी मुंबईतील बालनाट्य व नाट्यसंस्थाकरीता महत्वाच्या आणि विविध चार विषयांवर निवेदन देऊन चर्चा केली.
वाशीमध्ये विष्णुदास भावे हे पालिकेचे स्वतःचे नाट्यगृह आहे. नवी मुंबईतील बालनाट्यसंस्थांना पालिकेने हे नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले तर येथील बालरंगभूमी अधिक समृद्ध आणि सक्षम होण्यास मदत होईल. बालनाट्याकरीता पालिकेने नाटयगृह दरपत्रकातील दरांच्या 50 टक्के कमी दराने आकारणी करण्याची सवलत दिली आहे. मात्र ही सवलत शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून दिली आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ बालकलाकरांना मिळत नाही. त्यामुळे ही सवलत सुट्टीच्या दिवशीही मिळावी जेणेकरुन कलाकारांना पालिकेच्या नाट्यगृहाचा लाभ घेता येईल. या अनुषंगाने शालेय दिवस वगळून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवारी, रविवारी नाट्यगृह बालकलाकरांसाठी उपलब्ध करुन अनामत रक्कमेत 50% सवलत द्यावी. शिवाय येथील कला संस्थांना पालिकेच्या विविध विभागातून होणाऱ्या जनजागृती कार्यक्रमाची कामे देण्यासाठी प्राधान्य असे सुनील पगार यांनी सांगितले.
प्रशासकीय कार्यकाळात नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईतील कलाकार आणि नाट्य संस्थांकडे दुर्लक्ष केले आहे. यापुढे मात्र पालिकेने त्यांच्या ध्येय - धोरणांमध्ये नवी मुंबईतील विविध प्रकारातील सर्व कलाकारांना सामावून घ्यावे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.नवी मुंबईतील नृत्य, नाट्य व बालनाट्य संस्थांना फुकट काही नको पण, सवलत द्या एवढीच आमची मागणी आहे. - सुनील रमेश पगार, नवी मुंबई भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ - प्रभारी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai