Breaking News
नवी मुंबई आणि नैना शहराकरिता परिवहन आराखडा तयार करण्यात येणार
नवी मुंबई ः सिडकोतर्फे नवी मुंबई आणि नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) शहराकरिता सर्वसमावेशक परिवहन आराखडा तयार करण्यात येणार आहे. सन 2054 पर्यंत पर्यावरणदृष्ट्या शाश्वत आणि सर्वसमावेशकतेवर आधारित परिवहन धोरण निर्माण करणे, सुरक्षित, कार्यक्षम व शाश्वत वाहतूक, वाहतुकीच्या सर्व साधनांचे एकात्मीकरण, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन ही उद्दिष्टे साध्य करण्याकरिता सदर आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहने व चालणे आणि सायकलिंग यांसारख्या गैरस्वयंचलित परिवहन प्रकारांचे एकात्मीकरण करून साकल्यवादी दृष्टीकोनातून परिवहनाचे नियोजन करणे अभिप्रेत आहे. वेगाने होणारे शहरीकरण, वाढती लोकसंख्या, लोकसंख्येची दाटीवाटी आणि पर्यावरणीय मुद्दे, या भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी सीएमपी आराखडा तयार करण्यात येणार आहे.
परिवहनाच्या पायाभूत सुविधांचा विचार करता सद्यस्थितीत नवी मुंबईमध्ये ठाणे-बेलापूर मार्ग, पाम बीच मार्ग, शीव-पनवेल महामार्ग, अटल सेतू यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांसह 980 कि.मी. चे विभागीय व अंतर्गत रस्त्यांचे जाळे, 60 कि.मी. हून अधिक लांबीचे रेल्वे मार्ग, नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा तसेच नवी मुंबई महानगरपालिका, बेस्ट, एमएसआरटीसी इ. प्राधिकरणांच्या बस सेवा स्थानिक व प्रादेशिक कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अटल सेतू, मेट्रो मार्ग क्र. 8 (नमुंआंवि व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा), पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्ग, बेलापूर ते नमुंआंवि दरम्यान मेट्रो मार्ग क्र. 1 चा विस्तार या परिवहन प्रकल्पांमुळे एकात्मीक परिवहन धोरण निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन व्यवस्थेतील त्रुटी, गुंतवणुकीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, परिवहनाच्या स्थानिक व प्रादेशिक गरजांना अनुसरून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करता येईल असा रोडमॅप तयार करणे, याकरिता सीएमपी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच मेट्रो व अन्य सार्वजनिक परिवहन प्रकल्पांकरिता केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून घेण्याकरिता देखील सीएमपी अनिवार्य आहे.
सीएमपीद्वारे नवी मुंबई आणि नैना यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, जेएनपीटीतर्फे प्रस्तावित उत्पादन केंद्र, एनएमआयआयए, कॉर्पोरेट पार्क, एरोसिटी इ. महत्त्वाच्या प्रकल्पांसोबत एकात्मीकरण करणे, नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील कार्यक्षम चलनशीलतेकरिता पर्यावरणदृष्ट्या शाश्वत आणि समन्यायी तत्त्वावर आधारित दीर्घकालीन परिवहन धोरण तयार करणे, राष्ट्रीय नागरी परिवहन धोरणानुसार नवी मुंबई आणि नैना क्षेत्रामध्ये गैरस्वयंचलित व सार्वजनिक परिवहन प्रकारांना चालना देणे, एमएमआर अद्ययावतीकरण सविस्तर अभ्यास जाळ्याकरिता नवी मुंबई व नैनामधील जाळ्याचे सीटीएससोबत एकत्रिकरण करणे, वाहतूक परिचालन व रस्ते सुरक्षेमध्ये सुधारणा करण्याकरिता उत्तम वाहतूक अभियांत्रिकी पद्धतिंची अंमलबजावणी करण्यासह परिवहन जाळ्याचा विकास करणे, पुरेशा वाहतूक व्यवस्थापन उपायोजनांचे पूर्वनियोजन करणे, या उद्दिष्टांची पूर्तता होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कॉर्पोरेट पार्क, एरोसिटी, एज्युसिटी, लॉजिस्टीक पार्क, मेडीसिटी या प्रकल्पांसह निवासी व औद्योगिक वाढ, या घटकांमुळे नवी मुंबईतील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्राकरिता सिडको व अन्य प्राधिकरणांना वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि भविष्यसिद्ध परिवहन प्रणाली विकसित करण्याकरिता सीएमपी मार्गदर्शक ठरणार आहे. -विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai