Breaking News
कुस्तीगीर विनेश फोगट यांचे सुवर्णपदक फक्त 100 ग्राम अतिरिक्त वजनामुळे हुकले. एका दिवसात तिने तीन कुस्त्या लगोलग जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिने कधीही न हरलेल्या जपानच्या खेळाडूचा पराभव करून भारताला सुवर्ण पदकाची आशा दाखवली. भारतात सर्व घटकांत त्यामुळे एक जोश निर्माण झाला होता. सर्वत्र विनेश फोगटच्या कर्तृत्वाचीच चर्चा होती. परंतु आनंद औटघटकेचा ठरला. चोवीस तास उलटत नाही तोच विनेश फोगट वाढलेल्या वजनामुळे अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्याची बातमी सर्वत्र झळकली. क्षणात विज कोसळावी आणि होत्याचे नव्हते व्हावे तसेच भारतीयांच्या स्वप्नाचे झाले. जो खेळाडू ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभर परिश्रम करतो आणि त्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करतो त्याच्यावर कोणता आघात झाला असेल त्याची मोजमाप शब्दात नाही करता येणार. सर्व काही आकस्मित आणि अकल्पित घडले....
वजन वाढले फक्त 100 ग्राम पण त्याचा 100 रिस्टल स्केलचा झटका भारतीयांना बसला. देशात संतापाची लाट उठली, फक्त 100 ग्राम...फक्त 100 ग्राम... हीच चर्चा सध्या प्रसार माध्यमांवर सुरु असून संपूर्ण भारत या प्रसंगी विनेशच्या सोबत असल्याचे जरी बोलले जात असले तरी प्रत्येक बाबतीत राजकारण करण्याचा भारतीयांचा यातून स्वभाव मागे कसा राहील. खरंतर विनेशला आधाराची गरज आहे, प्रचंड धक्क्यातून सावरण्यासाठी तिला थोडा वेळ द्यायला हवा आहे. तिने गमावलेले रजत पदक तिला कसे मिळेल यासाठी कायदेशीर प्रयत्न देशाकडून व्हायला हवेत. तिची बाजू मांडण्यासाठी सरकारने साळवी यांना नेमल्याने सर्वानी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करायला हवे. भले मग निर्णय काहीही येवो. परंतु याउलट आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने क्रिडा मंत्र्यांना संसदेत निवेदन करावे लागले. पण प्रसंगाचे गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांनी देखील सरकारने केलेल्या विनेशवरील खर्चाचा पाढा वाचला आणि पुन्हा लोकांच्या संतापाला आमंत्रण दिले. सरकारचे निवेदन कदाचित बरोबर असेल, आपण कशापद्धतीने फोगट यांना साहाय्य केले हे सांगावयाचे असेल पण वेळ चुकीची होती हे निश्चित.
विनेश हिने यापूर्वीच देशाचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये फडकावला आहे. 53 किलो वजनी गटात तिने अनेक मेडल्स भारताच्या नावावर केली आहेत. त्यामुळे तिच्याकडून यावेळीही मोठ्या अपेक्षा होत्या. आपल्या कारर्कीदीची सुरुवात विनेश हिने 48 किलो वजनाच्या गटातून केली. जसजसे वय वाढू लागले तसतसे विनेशने आपला वजनाचा गट बदलून 53 किलो गटात कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. गेली अनेक वर्ष ती ह्याच गटात कुस्तीखेळत असल्याने तिला वजन घटवून 50 किलो गटात का खेळण्यास सांगण्यात आले हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. तिला कुस्ती फेडेरेशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संजयसिंग यांनी 50 किलो गटातच ऑलिम्पिकसाठी जागा असल्याचे सांगितले. तो प्रस्ताव पण तिने स्वीकारला आणि आपले वजन कमी करून ऑलिम्पिकसाठी आपली निवड सार्थ ठरवत अंतिम फेरीत धडक मारली. विनेश हिने सर्व लढतीत दाखवलेली चमक उल्लेखनीय आहे. पण आदल्यादिवशीपर्यंत पूर्ण नियंत्रणात असलेले वजन वाढलेच कसे इथे येऊन प्रश्न थांबतो.
विनेश फोगट हिच्यासोबत असलेला स्टाफ हा तिचा स्वतःचा होता. खेळाडूला तिच्यासोबत प्रशिक्षक, ट्रेनर, डायटेशिअन पाठवले जातात. खेळाडू स्पर्धेच्या वेेळी पूर्ण लक्ष आपल्या खेळावर आणि ज्या खेळाडूंसोबत लढत असते तिच्याशी लढण्यासाठी लागणाऱ्या डावपेचांवर केंद्रित करतो. अशावेळी खेळाडूला आवश्यक मात्रेमध्ये खुराक देण्याची जबाबदारी हि डायटेशिअनची असते. मग विनेशला गरजेपेक्षा अधिक खुराक देण्यात आला का हा प्रश्न येतो. पण, खुराक देणारा डायटेशिअनही विनेशचाच होता मग हि गफलत कशी झाली हा एक संशोधनाचा विषय राहिल. पण, अंतिम फेरीत गेल्यावर पडणाऱ्या ताणामुळे, लोकांच्या अपेक्षांमुळे वजन वाढू शकते असा तर्कहि दिला जात आहे. प्रत्येक व्यक्तीची बॉडी हि वेगवेगख्या प्रसंगी वेगवेगळा प्रतिसाद देत असते. वजन कमी करण्यासाठी विनेश हिने रात्रभर प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. तिने केस कापले, रात्रभर व्यायाम केला तरी वजन कमी झाले नसल्याचे सांगितले जात आहे. मग नक्की वजन किती वाढले होते हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
विनेश अपात्र ठरली हा जसा तिच्यासाठी दुर्दैवी निर्णय होता तसाच तो संपूर्ण भारतासाठीही अकल्पित होता. रात्रीपर्यंत विनेशला सुवर्णपदक मिळेल या आशेने तिच्या लढतीकडे लक्ष ठेवून असणारा भारतीय मात्र तिच्या अपात्रतेची बातमी येताच स्तब्ध झाला. विरोधकांनी सरकारवर आरोप करायला सुरुवात केली. काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेमागे षडयंत्र असल्याचा आरोपही केला. पण, यातील कितीजणांनी विनेशला आधार दिला हा महत्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधानांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून विनेशला धीर दिला पण ज्यावेळी ती जंतरमंतरवर लढत होती त्यावेळी हाकेच्या अंतरावर असताना का नाही ट्विट केले असा प्रश्न विचारून पंतप्रधानांच्या माध्यमांवरील वक्तव्यावर टीका केली. संसदेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर तिच्या खर्चाचा हिशोब देण्यात आला. एका विरोधी पक्षाने तर तिला राज्यसभेची खासदारकी देऊनही टाकली. सर्वच जण मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खायला टपलेत. हे सर्व संवेदनाहींन आणि अकल्पित आहे.
विनेशने दुःखद अंतःकरणाने आपली निवृत्ती जाहीर केली आहे हेही अकस्मात. विनेशने ऑलिम्पिक समितीकडे आपल्याला रजत पदक द्यावे अशी मागणी केली आहे. जगभरातून खेळजगतातून तिच्या मागणीला समर्थन मिळत असताना आपण भारतीय मात्र उणीधुणी काढण्यात व्यस्त आहोत. भारत सरकारनेही हरीश साळवे यांना सुनावणीसाठी उभे केले आहे. भारत सरकारने आपला निषेधही ऑलिम्पिक समितीकडे नोंदवला आहे. आता विनेशला रजत पदक द्यायचे की नाही हे या सुनावणीतून निश्चित होईल. सूनावणीतून जो काही निकाल यायचा तो येईल, पण देशवासीयांच्या मनावर विनेशने आपले नाव सुवर्ण अक्षराने केव्हाच कोरले आहे. त्यामुळे येणाऱ्या सकारात्मक वा नकारात्मक निर्णयाने नाराज न होता विनेशने आपला सराव सुरूच ठेवावा, अशी अनेक पदके व सन्मान देशाच्या शिरपेचात रोवून यापुर्वी जसे दिले तसे अनेक आनंदाचे व अभिमानाचे क्षण भारतीयांना द्यावेत. त्यामुळे आता घडलेल्या घटनेकडे दुर्लक्ष करून विनेशचे स्वागत न भूतो न भविष्यती असेच करण्याची जबाबदारी भारतीयांचीही आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनीही यात राजकारण व अहंकार न करता संपुर्ण भारत हा विनेशच्या पाठिशी आहे असे दाखवून देणे गरजेचे आहे. झाले ते खुप झाले आता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची व आपल्या ऑलिम्पिकमध्ये यशस्वी व अयशस्वी झालेल्या खेळाडूंना समर्थन देणे गरजेचे आहे. आमचाही या ‘अभिनिवेशी' विनेशला मानाचा मुजरा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे