Breaking News
नवी मुंबई ः संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन 2025 हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जयंती वर्ष असून यानिमित्त मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार शासनामार्फत निर्गमित परिपत्रकाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात ज्ञानेश्वर माऊलींचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सजवलेल्या पालखीत ठेवलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून महापालिका मुख्यालयातून दिंडी स्वरूपातील मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. टाळ-मृदुगांच्या गजरात, लेझिम पथकासह मुख्यालयासमोरील सेवारस्त्याने निघालेल्या दिंडीमध्ये आबालवृध्द नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. विशेषत्वाने ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मुख्याध्यापक रत्नाकर तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी वेशात लेझीम पथकासह दिंडीत सहभागी होते. युवक, युवतींचाही दिंडीत लक्षणीय सहभाग होता.
‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामगजरासह दिंडीत सहभागी ज्ञानाई प्रासादिक भजन मंडळ करावे यांचे भजनीबुवा पंढरीनाथ भोईर, विजय नाईक, रविंद्र भोईर तसेच नेरूळचे अमृतबुवा पाटील या वारकरी बुवांनी तसेच पत्रकार मनोज जालनावाला यांनी अभंगांचे गायन करीत दिंडीला भावस्वर प्रदान केला. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारीही दिंडीमध्ये शुभ्रधवल वारकरी वेश परिधान करून सहभागी झाले होते. नवी मुंबईतील विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांचा दिंडीत सहभाग होता. स्वच्छता दिंडीच्या परिधान केलेल्या टोप्या लक्ष वेधून घेत होत्या.
विशेष म्हणजे रस्त्यामध्ये ठिकठिकाणी थांबून तसेच मुख्यालयाच्या प्रांगणात रिंगण घालत फुगड्या, झिम्मा सारखे दिंडीतील खेळही खेळण्यात आले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने दिंडीची भावपूर्ण सांगता झाली. त्यानंतर मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये सुप्रसिध्द गायक मंगेश बोरगांवकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तिरंग स्वरयात्रेत सारेजण रंगून गेले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750 वा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबईकर ज्या उत्साहाने एकत्र आले त्याचा विशेष उल्लेख आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai