Breaking News
ठेकेदाराचा नवी मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना
नवी मुंबई ः आठ वर्षांपुर्वी नवी मुंबई महापालिकेने नाला बंदीचा करोडो रुपये खर्चाचा अभिनव उपक्रम हाती घेतला होता. आपल्या प्रभागातील नाले बंदिस्त व्हावे म्हणून स्थानिक नगरसेवक अग्रेसर होते. ही कामे पुर्ण झाली असली तरी या कामातील भ्रष्टाचाराचे शेवाळ उघडे पडल्याने पालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेच परंतु नवी मुंबईकरांना मात्र कोट्यवधींचा चुना ठेकेदारांनी लावला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गत महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात वाशी सेक्टर 17 येथील वाशी प्लाझा कमर्शिअल सोसायटीची मागील भिंत कोसळल्याची घडना घडली होती. या कोसळलेल्या भिंतीने मात्र सेक्टर 17 येथे बंदिस्त केलेल्या नाल्याचे गुपित उघडकीस आणले आहे. वाशी सायन-पनवेल महामार्गालगत असलेला नाला बंदिस्त करण्याचे काम महापालिकेने 8 कोटी रुपये खर्च करुन केले होते. सदर जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असतानाही महापालिकेने नगरसेवकांच्या उत्साहापोटी हे काम पुर्णत्वास नेले होते. यासाठी पालिकेने सल्लागार नेमला होता. संबंधित सल्लागाराने कामाचे मुल्य वाढावे म्हणून भलेभक्कम आरसीसी डिझाईन बॉक्स टाईप कल्व्हर्ट नाल्याचे केले होते. यामध्ये एक फुटाच्या रुंदीच्या भिंती, एक फुटाचा आरसीसी स्लॅब बांधण्यात आला आहे. परंतु, हे काम संबंधित सल्लागाराने व पालिका अधिकाऱ्यांनी नियमानुसार केले नसल्याचे उघडकीस आले आहे.
या बांधकामात आरसीसी भिंतीऐवजी एका बाजुला दगडाची भिंत बांधल्याचे दिसत असून त्यावर एक फुट जाडीचा स्लॅब ठेवल्याचे दिसत आहे. आरसीसी नाल्यामध्ये दगडाचे बांधकाम करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान संबंधित सल्लागार व पालिकेच्या अभियंता विभागाने विकसीत केल्याचे दिसत आहे. संबंधित भिंतीमुळे नाल्याची पाणी वाहुन नेण्याची क्षमता कमी झाली आहे. अशाप्रकारची कामे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. जनतेच्या प्रश्नांवर वाचा फोडणारे स्थानिकनगरसेवक याची दखल घेऊन या भ्रष्टाचाराच्या शेवाळावर कोणती फवारणी करतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पालिका आयुक्त या भ्रष्टाचाराच्या विरोधात संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचेवर कोणती कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, संबंधित कामाच्या नस्तीची मागणी केली असता नस्तीचा शोध सुरु असल्याचे संबंधित विभागाने कळविले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai