Breaking News
नवी मुंबई ः 19 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे व मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात मदतीसाठी दक्षतेने कार्यरत असून आयुक्त स्वत: शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी अत्याधुनिक एचडी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून महापालिका मुख्यालयातील अद्ययावत इंटिग्रेटेड कमांड कन्ट्रोल सेंटरयाव्दारे शहरातील स्थितीवर निरीक्षण व नियंत्रण ठेवले जात आहे. आयुक्तांनी या नियंत्रण कक्षाला भेट देत विविध विभागातील निरनिराळ्या ठिकाणावरील परिस्थितीची सकाळीच पाहणी केली व संबधितांना उचित व तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.30 ते सायं. 4.30 पर्यंत 89.56 मिमी. पर्ज्यन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याची ठिकाणे तुरळक असून ती प्रामुख्याने पूर्वेकडील डोंगरामधून येणाऱ्या नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात अतिवृष्टीमुळे पाण्याची वाढ होत असल्याने त्या आसपासच्या भागातील आहेत. यादवनगर आदिवासी पाडा व ट्रक टर्मिनल समोरील खोल भागात लगतच्या डोंगरावरील पाणी साचून आश्रम वस्तीत येत होते. त्याठिकाणी जेसीबी लावून बांध घालण्यात आला व पाण्याचा प्रवाह नाल्याकडे प्रवाहित करण्यात आला. तसेच महापे मिलिनियम बिझनेस पार्क समोर, एमआयडीसी भागात जेसीबीव्दारे ड्रेबीज काढून पाण्याला मोकळी वाट करून देण्यात आली व बंदिस्त झालेल्या वॉटरएन्ट्रीज खुल्या करण्यात आल्या. तुर्भे एमआयडीसी मुख्य रस्ता इंदिरानगर, घणसोली नोसिलनाका ब्रिजजवळील मुख्य रस्त्यावरील कॉर्नर, ऐरोली भारत बिजली जवळील कॉर्नर, कृष्णावाडी दिघा, कृष्णा स्टील झोपडपट्टी तुर्भे अशा डोंगर भागाकडून पाणी वाहत येणाऱ्या ठिकाणी पाणी साचल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याठिकाणी वाहत्या पाण्यातील अडथळे दूर करुन साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे नागरी क्षेत्रात सखल भागातील अक्षरदर्शन सोसा. कमी वेळेत मोठया प्रमाणात सातत्याने पर्जन्यवृष्टी झाल्याने सेक्टर 7 ऐरोली समोरील रस्ता, मॅफको मार्केट समोरील रस्ता तुर्भे एपीएमसी मार्केट जवळ, दिघा मुकंद ब्रिजच्या खाली, दिघागाव स्टेशनसमोर, ऐरोली अष्टदर्शन सोसा. सेक्टर 5, कोपरखैरणे अंडरपास, घणसोली अंडरपास, सानपाडा जुईनगर अंडरपास, रबाळे अंडरपास, गवळी हॉस्पिटलजवळ रबाळे अशा ठिकाणांवरही काही प्रमाणात पाणी साचल्याने पाणी उपसा पंपांची संख्या वाढविण्यात आली. तसेच 5 ठिकाणी झाडे पडल्याने रहदारीला येणारे अडथळे तत्परतेने दूर करण्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले.
कोपरखैरणे महापे अंडरपास येथे पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओ वाहन आणि बस मधील 5 व्यक्तींना नमुंमपा अग्निशमन दलाने सुखरुप बाहेर काढले. त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रोड वरील रिलायन्स एम्पायर टॉवर जवळील नाल्यात वाहून जाणाऱ्या म्हशीला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. तुर्भे कृष्णा स्टिल झोपडपट्टी भागात अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने तेथील 90 हून अधिक नागरिकांचे बाजुच्या गामी कंपनीमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आले व त्यांच्या जेवणाची व्यवस्था तुर्भे विभाग कार्यालयामार्फत करण्यात आली व त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चर खणण्यात आला. सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने शहरातील वाहतुक व रहदारी काही ठिकाणी संथ गतीने सुरळीत सुरू आहे तसेच एनएमएमटी बसेसही प्रवासी सेवा पुरवित आहेत.
मोरबे 86.95 मिटर पाणी पातळी
मोरबे धरण क्षेत्रातही मोठया प्रमाणात पाऊस पडला असून मंगळवारी सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 पर्यंत 98.80 मि.मी. इतक्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची कमाल क्षमता 88 मिटर इतकी असून आत्तापर्यंत 86.95 मिटर इतकी धरण पातळी झालेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai