बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला

कामाच्या दर्जाबाबत शंका ; चौकशीची मागणी

नवी मुंबई : गेले दोन-तीन दिवस सुरु असलेल्या पावसाने नवी मुंबईलाही झोडपुन काढले आहे. सततच्या जोरदार पावसामुळे नवी मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला. ढासळलेली बाजू हा बेलापूरच्या किल्ल्याचा टेहळणी बुरुज होता. यावेळी परिसरात कुणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र काम सुरु असतानाच बुरुज ढासळल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

इतिहासकालीन असलेली वास्तू म्हणून नवी मुंबईतील बेलापुर किल्ल्याची ओळख आहे. हा किल्ला पोर्तुगिजांकडून चिमाजी आप्पा यांनी ताब्यात घेतला होता. आज ढासळलेल्या बुरुजावरुन शत्रूवर नजर ठेवण्याचं काम केलं जायचं. किल्ल्याचं संवर्धन करण्याचं काम सध्या सिडकोकडून सुरू असून, त्यातच आता किल्ल्याचा टेहाळणी बुरूज अचानक ढासळला. सतत पडणार्‍या मुसळधार पावसाचा फटका बसल्याने शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बेलापुर किल्ल्याच्या संवर्धनासाठी 18 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. हे काम हाती घेण्यापूर्वी काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली होती.  ऐतिहासिक वास्तू संवर्धन क्षेत्रातील अनुभव असलेल्या कंपनीला आराखडा बनवण्याचे काम दिलेलं आहे. मात्र काम सुरु असतानाच ही दुर्घटना घडल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी परिसरात कुणी नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, डॉ. संजय मुखर्जी यांनी बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरुज कोसळल्याच्या घटनेची दखल घेतली असून, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी, मुख्य अभियंता व अन्य संबंधित अधिकार्‍यांनी तात्काळ घटना स्थळाची पाहणी केली. या घटनेची व कामाच्या दर्जाची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.