Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलाने मागील अडीच वर्षात सातत्याने नशामुक्ती अभियान प्रत्यक्षात राबविल्यामुळे 1831 गुन्हे दाखल करून 2,854 गुन्हेगारांना पकडण्यात आले. या धरपकडीत 70 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल पोलीस दलाने जप्त केला. यातील जप्त केलेल्या 26 कोटी 48 लाखांचा अमली पदार्थांचा साठा शुक्रवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीतील भस्मीकरण यंत्रात टाकून तो साठा खाक करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आ. मंदा म्हात्रे, नवी मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त संजय येनपूरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे संचालक सोमनाथ मालघर हे उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कारकिर्दीत गेल्या अडीच वर्षांपेक्षाच्या अधिकच्या काळात नशामुक्ती नवी मुंबई अभियान सर्वच पोलीस दलाने हाती घेऊन त्यावर कठोर अंमलबजावणी केली. दोन वर्षात आतापर्यंत 38 कोटी रुपयांचा अमलीपदार्थाचा साठा जप्त करून तो साठा तळोजा येथील भस्मीकरण यंत्रात भस्म करण्यात आला. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी 26 कोटी 48 लाख रुपयांचे अमलीपदार्थ तळोजा येथील रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या भस्मीकरण यंत्रात टाकण्यात आले. ही कारवाई भाजपचे आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पाडली. गेल्या अडीच वर्षांच्या काळात अमली पदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये 101 आफ्रिकन नागरीकांना पोलिसांनी अटक (पान 7 वर)
केल्यानंतर त्यांच्याकडुन 40 कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई मध्ये अवैधरित्या राहत असलेल्या आफ्रिकन नागरीकांवरील कारवाईत 2034 आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हद्दपार करुन त्यांना परत त्यांच्या देशात पाठविले आहे. त्यापैकी 989 आफ्रिकन नागरीकांची नावे पारपत्र विभागाव्दारे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत. अमली पदार्थाचा तस्करीचा व्यवसाय करणाऱ्या 7 आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ व्यवसाय करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर अवैध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंधक कायद्यानूसार कारवाई करण्याचे 3 वेगवेगळे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरीता पाठविण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमावेळी सह पोलीस आयुक्त संजय येनपूरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai