नवी मुंबईकरांशी आयुक्त साधणार सुसंवाद

नवी मुंबई ः नागरिकांशी सुसंवाद साधत महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने विविध विभागातील स्वच्छताविषयक कामांचा तसेच नागरी सुविधा कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये अधिकारी वर्गासह भेटी देणार आहेत.

याबाबत पूर्व नियोजित 5 ऑक्टोबर 2018 रोजीचा ऐरोली विभागातील महापालिका आयुक्त भेटीचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे 10 ऑक्टोबर 2018 रोजी होणार आहे. 

या पाहणी दौर्‍यांमध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे विभागातील नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, सूचना जाणून घेणार आहेत. याकरीता नागरिकांना सकाळी 9.30 ते 10 या वेळेत टोकन क्रमांक दिले जाणार असून नागरिकांनी लेखी स्वरुपात आपल्या संकल्पना / सूचना / तक्रारी दोन प्रतीत महापालिका आयुक्तांकडे सादर करावयाच्या आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्त हे विभाग प्रमुख व संबंधित अधिकार्‍यांशी चर्चात्मक बैठक घेऊन विभाग कार्यालय परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार आहेत.  

 तसेच महानगरपालिकेशी संबंधित आपल्या विभागातील संकल्पना / सूचना / तक्रारी असल्यास आयुक्त भेटीच्या तारखेस उपस्थित राहून त्या लेखी स्वरुपात दोन प्रतीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेकडे सादर कराव्यात असे आवाहन केले आहे.