भूमीगत कचराकुंडीची अभिनव संकल्पना

 नवी मुंबई ः स्वच्छता अभियानाच्या अनुषंगानेही प्रत्येक वर्षी उल्लेखनीय उपक्रम हाती घेतले आहे. अशाच प्रकारचा भूमीगत कचराकुंडीसारखा एक स्वच्छताविषयक आगळावेगळा उपक्रम एल अँड टी सीवूड लिमी. या कंपनीच्या सीएसआर निधीतून करावेगांव येथे दोन ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आलेला आहे. पामबीच मार्गालगत श्रीबामणदेव भूयारी मार्गाजवळ तसेच श्रीगणेश तलावानजिक ह्या भूमीगत कचराकुंडया उभारण्यात आलेल्या असून त्यांचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते संपन्न झाले. 

 स्वच्छ, सुंदर शहराचा बहुमान मिळविणार्‍या नवी मुंबई शहरामध्ये कचराकुंडी ठेवणे गरजेचे आहे अशा दाट लोकवस्तींच्या ठिकाणी ठेवाव्या लागणार्‍या कचराकुंड्या या शहराच्या सुशोभिकरणाला साजेशा असाव्यात व त्यांच्यामुळे शहराच्या स्वच्छतेत भर पडावी या भूमिकेतून या भूमीगत कचराकुंड्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या कचाराकुंडी भोवतालचा परिसर शोभिवंत फुलझाडे लावून सुशोभित करण्यात आलेला आहे. या भूमीगत कचराकुंड्यामध्ये ओला कचरा व सुका कचरा असे दोन भाग असून पायाने पायडल दाबल्यानंतर कुंडीचे छोटे झाकण उघडते व कचरा टाकून झाल्यानंतर पायडलवरून पाय काढल्यावर ते बंद होते. त्यामुळे कचरा नजरेसमोर न राहता तो भूमीगत कुंडीत पडतो आणि सर्वसाधारणपणे कचराकुंडीमुळे दिसणारे दुर्गंधीचे वातावरण टाळले जाते. यामध्ये ओल्या व सुक्या कचर्‍यासाठी 1.1 क्युबिक मीटरच्या स्वतंत्र कचराकुंड्या असून कचरा वाहून नेण्यासाठी रिफ्युज कॉम्पॅक्टर आल्यानंतर हायड्रोलिक सिस्टिमव्दारे या भूमीगत कचराकुंड्या वर आणल्या जातील व त्यामधील कचरा कॉम्पॅक्टरमधून वाहून नेला जाईल. यामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भूमीगत कचराकुंड्या जमिनीच्या वर आणून त्यामधून कचरा काढण्याची व त्या कुंड्या पुन्हा पूर्ववत जागी ठेवण्याची यांत्रिक प्रक्रिया रिफ्युज कॉम्पॅक्टरच्या बॅटरीवरच करण्यात येत आहे.