ठाण्यातही कोट्यवधींची मुद्रांक शुल्क चोरी उघड
- by संजयकुमार सुर्वे
- Nov 14, 2025
- 424
मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर यांची 51.51 कोटी वसूलीसाठी मे. जगदाळे इन्फ्रा.प्रा.लि यांना नोटीस
नवी मुंबई ः ठाणे पाचपाखाडी येथे मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. राबवत असलेल्या झोपडपट्टी पुनविकास प्रकल्पात शासनाचे कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क बुडविल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी उघडकीस आणली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेवून मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर यांनी विकासक मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. यांना 51.51 कोटी रूपयांच्या वसूलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क बूडविल्याची आणखी प्रकरणे ठाण्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या मुद्रांक शुल्क चोरीची प्रकरणे दररोज उघडकीस येत असून शासनाने अनेक सह निबंधकांना निलंबित केले आहे. सध्या चर्चेत असलेल्या अमेडिया कंपनीच्या भुखंड प्रकरणामध्ये दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र बाळकृष्ण तारू तर सहाय्यक दुय्यम निंबधक विद्या बडे यांचा समावेश आहे. अशाच प्रकारचे नियोजित झोपडपट्टी गृहनिर्माण संस्थांसोबत विकसन करार करून त्यावरील मुद्रांक शुल्क भरले नसल्याची बाब ठाण्यातील एका प्रकरणात माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. एमएमआर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने ठाण्यातील मौजे पाचपाखाडी येथील शासनाच्या गुरचरण जमिन सर्व्हे नं. 502 येथे 40 हजार चौ.मी क्षेत्रावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांसाठी पुनर्विकास योजना मंजूर केली आहे. या योजनेचे विकसन हक्क प्राधिकरणाने मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. यांना बहाल केले आहेत. या क्षेत्रावर 18 नियोजित गृहनिर्माण संस्था असून त्यांचेसोबत विकासक मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. यांनी विकसन करारनामे करून ते झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला सादर केले आहेत. हे विकसन करारनामे करताना विकासकाने कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क भरले नसल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुर्वे यांनी याबाबत तक्रार करूनही झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर सुर्वे यांनी याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर यांच्याकडे तक्रार केली. जानेवारी 2025 मध्ये सुर्वे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर नारायण राजपुत यांच्याकडे तक्रार दाखल करूनही त्यांनी याप्रकरणात सप्टेंबर 2025 पर्यंत सदर मुद्रांक शुल्क वसूलीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अखेर खुप प्रयासानंतर नव्याने आलेले मुद्रांक जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी मे. जगदाळे इन्फ्रा.प्रा.लि. यांना 9 प्रकरणात 51.51 कोटी रूपये मुद्रांक शुल्क वसूलीची नोटीस महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, कलम 46 अन्वये बजावली आहे. या नोटीसी अंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड भरून कलम 39/41 अन्वये सदर दस्त प्रमाणित करून घेण्यास विकासक मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. यांना आदेशीत केले आहे. सदर रक्कम न भरल्यास जमिन महसूल थकबाकी म्हणून कार्यवाही करून वसूल करण्यात येईल याबाबत विकसकाला अवगत करण्यात आले आहे. नऊ प्रकरणात 51 कोटी रूपयांच्या वसूलीचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी काढले असून उर्वरित नऊ प्रकरणात लवकरच नोटीसा बजावण्याचे निर्देश संजय चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही वसूली 100 कोटींहून अधिक असण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते सुर्वे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर खुलासा करण्याचे आदेश देवूनही विकासक मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. यांनी आपले म्हणणे मांडले नसल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे शहरातून याप्रकरणानंतर अशाप्रकारची मुद्रांक शुल्क वसूलीची अनेक प्रकरणे उघडकीस येतील असे बोलले जात आहे. दरम्यान संबंधित विकासकाने यातून मार्ग काढण्यासाठी ठाण्याच्या ठाणेदाराकडे धाव घेतली असल्याची चर्चा आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने ठाणे शहरात दिलेल्या अनेक मंजूर प्रकरणात विकासकांकडून मुद्रांक शुल्क न भरता फक्त नोटरीकडे नोंदणीकृत केलेले विकसन करारनामे स्विकारले आहेत. संबंधित प्राधिकरणाचे हे कृत्य नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. त्यांनी दिलेल्या विकासकांना सवलतींमुळे शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लागला आहे. यातून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने स्वतःचे चांगभले केले आहे. मे. जगदाळे इन्फ्रा. प्रा. लि. हे या प्रकरणाचे हिमनगाचे टोक आहे. - संजयकुमार सुर्वे, माहिती अधिकार कार्यकर्ते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे