पुनर्विकासासाठी सिम्प्लेक्समधील रहिवाशी आक्रमक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 26
विलंबामुळे मनपा आयुक्तांच्या दालनावर धडक
नवी मुंबई ः घणसोली सेक्टर 7 येथील सिम्प्लेक्स परिसरातील सात सोसायट्यांच्या रहिवाशांनी सोमवारी मनपा आयुक्तांच्या दालनावर धडक देत पुनर्विकासाच्या कामातील विलंबाबद्दल प्रशासनाला जाब विचारला. तसेच तात्काळ पुनर्विकासासाठी मंजुरी देऊन स्ट्रक्चरल ऑडिटच्या निष्कर्षानुसार शहरी नूतनीकरण क्लस्टर पात्रतेचा अहवाल जारी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.
सन 2004 साली सिडकोकडून बांधण्यात आलेल्या सिम्प्लेक्स सोसायटीतील इमारतींमध्ये प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या दोन दशकांत इमारतींची झपाट्याने पडझड झाल्याने पावसाळ्यात भिंती गळणे, छताचे प्लास्टर कोसळणे, घरात ओलसरपणा आणि अंधार निर्माण होणे, तसेच सांडपाण्याच्या वाहिन्यांमधील बिघाड यामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. सध्या या परिसरातील एकूण 3264 कुटुंबांपैकी सुमारे 1200 ते 1300 कुटुंबांनी पडझडीच्या भीतीने इमारती सोडून इतरत्र स्थलांतर केले आहे. उर्वरित रहिवासी जीव मुठीत घेऊन या जीर्ण झालेल्या घरांमध्ये राहत आहेत. रहिवाशांनी पुनर्विकासाच्या दृष्टीने आयआयटी खरगपूर, व्हीजेटीआय आणि इतर संस्थांकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले असून, सर्व अहवालांमध्ये या इमारती मानवी वास्तव्यास अयोग्य आणि राहण्यास अतिधोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. युडीसीपीआर-2020 (2020) च्या 14.8.1 कलमानुसार या इमारती शहरी नूतनीकरण क्लस्टरच्या पात्रतेत बसतात, असा निष्कर्ष अहवालांत स्पष्ट करण्यात आला आहे. तरीदेखील नगररचना विभागाने पाहणी करूनही अद्याप पुढील कोणतीही कार्यवाही केली नाही. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राजकीय दबावाखाली त्यांच्या फाईली मुद्दाम दडपल्या जात असून, पुनर्विकासाच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाकडून विलंब केला जात आहे.
या निषेधार्थ सिम्प्लेक्स परिसरातील श्री गणेश कृपा को. ऑप. हौसिंग सोसायटी, माऊली कृपा को. ऑप. हौसिंग सोसायटी, कै. शिवाजीराव पाटील को. ऑप. हौसिंग सोसायटी, कै. आमदार अण्णासाहेब पाटील; को. ऑप. हौसिंग सोसायटी, श्री गुरुदेव दत्त; को. ऑप. हौसिंग सोसायटी, श्री हनुमान; को. ऑप. हौसिंग सोसायटी, ओम साई धाम को. ऑप. हौसिंग सोसायटी अशा सात सोसायट्यांतील शेकडो नागरिकांनी सोमवारी मनपा आयुक्तांच्या दालनावर एकत्र येत ठिय्या दिला. रहिवाशांनी प्रशासनाकडे तात्काळ पुनर्विकासासाठी मंजुरी देऊन स्ट्रक्चरल ऑडिटच्या निष्कर्षानुसार शहरी नूतनीकरण क्लस्टर पात्रतेचा अहवाल जारी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai