पत्नीवर हल्ला करुन फरार झालेला पती जेरबंद

 नवी मुंबई : दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग मनात धरुन झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करुन पळून गेलेल्या पतीला अटक करण्यात कोपरखैरणे पोलिसांना  यश आले आहे. राजाराम मांगीलाल मालिवय उर्फ राजु मेहरा (39) असे या आरोपीचे नाव असून गत महिन्याभरापासुन हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. या आरोपीच्या ठावठिकाणाची काहीएक माहिती नसताना पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत.  

आरोपी राजु मेहरा हा घणसोली सेक्टर-4 मधील झोपडपट्टीत पत्नी रत्ना व सहा मुलींसह राहाण्यास होता. आरोपी राजु मेहरा याला दारु पिण्याचे व्यसन अल्यामुळे तो दरदिवशी दारु पिऊन आल्यानंतर पत्नीसोबत भांडण करत होता. गत 24 ऑक्टोबर रोजी देखील सायंकाळी राजु दारु पिऊन आल्यानंतर त्याने रत्नाकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र रत्नाने त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तिला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेजारीच रहाणारी रत्नाची आई व बहिण तिथे आल्यांनतर राजु मेहरा याने पलायन केले होते. त्यानंतर रात्री उशीरा आपल्या घरी परतलेल्या राजुने झोपेत असलेल्या रत्नाच्या डोक्यात घरातील हतोडीने हल्ला करुन पलायन केले होते. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या रत्नाला मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.  

त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांकडून फरार झालेल्या राजु मेहरा याचा शोध सुरु असतानाच 31 मार्च रोजी रत्नाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजु मेहरा याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. आरोपी राजु मेहरा हा फिरस्ता असल्याने त्याच्या रहाण्याचे निश्‍चित ठिकाण नव्हते. तसेच तो त्याच्या कुठल्याही नातेवाईकाच्या संपर्कात नव्हता. तसेच तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्यामुळे पोलिसांनी सोशल मिडीयावरुन त्याचे फोटो प्रसारीत करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. अखेर आरोपी राजु मेहरा हा आपला वेष व नाव बदलून सीबीडी परिसरात रहात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्याला सीबीडी बेलापुर येथून जेरबंद केले. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, वसीम शेख, पोलीस उपनिरीक्षक सम्राट वाघ व त्यांच्या पथकाने केली.