खासदार विचारेंनी मांडल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली रेल्वे अधिकार्‍यांशी बैठक

नवी मुंबई ः दरवर्षीप्रमाणे रेल्वे प्रशासनाच्या विविध समस्या व काही सूचना सुचविण्यासाठी खासदार व रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात होणारी बैठक रद्द करून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजिव मित्तल व मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक शलभ गोयल तसेच एम आर व्ही सी चे चेअरमन रवी खुराना तसेच इतर खासदार उपस्थित होते.

बैठकीला खासदार राजन विचारे यांनी सिडकोने विकसित केलेल्या सर्व स्थानकांमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सरकते जिने बसविण्याची मागणी रेल्वे व सिडको प्रशासनाकडे केली आहे. खासदार राजन विचारे यांनी ही मागणी यापूर्वीही केली होती. परंतु रेल्वे व सिडको या दोघांमधील समन्वय साधण्यासाठी सिडको व रेल्वे प्रशासनाबरोबर वारंवार बैठक घेऊन सुद्धा रेल्वे प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे प्रश्‍न मार्गी लागत नाही. त्यामध्ये सिडकोने रेल्वेकडे या मार्गावर नवीन लोकल चालविण्यासाठी निधी उपलब्ध केला होता. परंतु रेल्वे प्रशासनाकडून पूर्तता न केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच नेरूळ रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवण्याची मागणी वारंवार करून सुद्धा रेल्वे व सिडको त्या दोघांमधील समन्वयक साधण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात यावी ही मागणी विचारे यांनी केली. त्यावर त्यांनी 16 डिसेंबर 2020 रोजी बैठक आयोजित करण्यात येईल असे कळविले. तसेच बेलापूर आयकर कॉलनी येथील एमआरव्हीसी मार्फत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम तसेच या हार्बर मार्गावरील मंजूर करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम जलद गतीने सुरू करण्याची मागणी विचारे यांनी केली आहे. त्यामध्ये मागणीनुसार ठाणे-ऐरोली या रेल्वे मार्गात हे भुयारी मार्गाला स्वीकृती देण्यात आली आहे. वाशी-सानपाडा दरम्यान सीवडू-नेरूळ दरम्यान सीवूड-बेलापूर दरम्यान अशा तीन पादचारी तयार करण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. त्याचबरोबर खासदार राजन विचारे यांनी रबाले स्थानकात नवीन तिकीट खिडकी सुरू करण्याचे तसेच इतर हि स्थानकात बंद असलेल्या एटीव्हीएम मशीन सुरू करून वाढ करावी. तसेच हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील महिला विशेष वातानुकूलित सेवा वाढविण्यात यावे अशा मागण्या खासदार राजन विचारे यांनी केल्या.

नेरूळ-बेलापूर-उरण या मार्गावरील स्थानकांची स्थिती जाणून घेऊन त्यांनी दिघा इलटण पाडा येथील ब्रिटिशकालीन धोकादायक झालेल्या धरणाची डागडुजी करण्यासाठी हे धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करावे अशी मागणी पुन्हा एकदा केली असून त्यावर रेल्वेने हे धरण लिजवर देण्याचा प्रस्तावावर कार्यवाही केली जाईल असे कळविले आहे.