24 तासात कोव्हीड चाचणी अहवाल द्या

सर्व खाजगी लॅबला आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

नवी मुंबई ः पालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड टेस्टींग लॅबच्या प्रमुखांशी आयुक्तांनी वेबसंवाद साधत क्षमतेएवढेच सॅम्पल घेऊन कोव्हीड चाचणी अहवाल 24 तासात उपलब्ध करून देण्याविषयी सक्त निर्देश दिले. तसेच अहवाल प्राप्त होईल तितक्या लवकर त्यांच्यावर उपचार सुरू करणे सोयीचे ठरेल.

महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा दररोज वेबसंवादाव्दारे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर घेत आहेत. 50 वर्षावरील नागरिकांना गृह विलगीकरणात न ठेवता महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये अथवा रूग्णांच्या इच्छेनुसार खाजगी रूग्णालयात दाखल करणेविषयी आयुक्तांमार्फत यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहेत. दररोज 50 वर्षावरील कोरोना बाधितांच्या आरोग्य स्थितीचा व्यक्तीनिहाय आढावा घेत असताना खाजगी लॅबमधून कोरोना बाधितांचा कोव्हीड चाचणी अहवाल उपलब्ध होण्यात 24 तासापेक्षा अधिक कालावधी, कधीकधी 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने आज महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड टेस्टींग लॅबच्या प्रमुखांशी आयुक्तांनी वेबसंवाद साधत कोव्हीड चाचणी अहवाल 24 तासात उपलब्ध करून देण्याविषयी सक्त सूचना दिल्या. 

काही खाजगी लॅबमधून कोव्हीड चाचणी अहवाल मिळण्यासाठी 2 ते 4 दिवस लागत असल्याने अहवाल आल्यानंतर सदर कोरोना बाधितांवर उशीरा उपचार सुरू होतात. सध्या कोव्हीडच्या दुसर्‍या लाटेत रूग्णाची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रूग्ण कोव्हीड पॉझिटिव्ह आहे हे कळण्यास अहवाल 24 तासात प्राप्त न झाल्याने उशीर झाल्यास रूग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच त्यांच्या संपर्कांतील व्यक्ती शोधासही विलंब होतो. त्यामुळे या गोष्टीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधत आयुक्तांनी सर्व खाजगी लॅबच्या प्रमुखांना कोणत्याही परिस्थितीत सॅम्पल घेतल्यापासून 24 तासांपेक्षा अधिक वेळ कोव्हीड चाचणी अहवाल द्यायला लागू नये असे स्पष्ट निर्देश दिले. जेणेकरून कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्तीवर पुढील उपचार योग्य वेळेत करणे सुकर होईल. यावेळी अहवालाची डाटा एन्ट्री करताना येणार्‍या अडचणींविषयी खाजगी रूग्णालय प्रतिनिधींनी शंका उपस्थित केल्या. त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. पोर्टलवर अहवालाची डाटा एन्ट्री करताना चाचणी केलेल्या व्यक्तीचा पत्ता आणि संपर्कध्वनी क्रमांक काळजीपूर्वक व पूर्णपणे व्यवस्थित भरण्याचे सर्व लॅबला सूचित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दैंनदिन कोव्हीड टेस्टींगचे सरासरी प्रमाण वाढले असून पहिल्या लाटेत जे प्रमाण प्रतिदिन सरासरी 3 हजार टेस्टींग होते ते आता प्रतिदिन 7800 टेस्टींग इतके आहे. 

कोव्हीड रूग्णांवर विहित वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने त्यांचा चाचणी अहवाल जलद प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे सॅम्पल घेतल्यानंतर जितका जलद अहवाल प्राप्त होईल तितक्या लवकर त्यांच्यावर उपचार सुरू करणे सोयीचे ठरेल हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड टेस्टींग लॅबला आपल्या दैनंदिन क्षमतेइतकीच सँपल्स घ्यावीत व 24 तासांमध्ये चाचणी अहवाल द्यावेत असे आदेशित केले आहे.