डाक विभागामार्फत ‘योग दिवस’ उत्साहात

पनवेल : 21 जून रोजी सातवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ नवी मुंबई डाक विभागामार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डाक विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रम नवी मुंबई डाक विभागाचे मुख्य टपाल कार्यालय असलेल्या पनवेल हेड पोष्ट ऑफिसमधे देखील साजरा करण्यात आला. 

सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्त्य साधून भारतीय डाक विभागामार्फत योगाचे महत्व विषद करणारा ‘विशेष कॅन्सलेशन’ उपक्रम आयोजित करण्यात आला. देशभरातील आठशे दहा मुख्य टपाल कार्यालयांमधे 21 जून रोजी नोंदणी झालेल्या सर्व टपालावरील तिकीटांवर योग संबंधीत संदेश हिंदी व इंग्रजी भाषेतून उमटविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयक जागृती निर्माण होण्यासाठी ‘योग करा-घरी राहा’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी इ-निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये सेंट जोसेफ हायस्कूल व रायन इंटरनँशनल स्कूल, पनवेल येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच संपूर्ण लॉकडाऊनमधे सेवा देणार्‍या डाक कर्मचार्‍यांना योगासंबंधीत माहिती देण्यासाठी ई-वेबीनारचे आयोजन नवी मुंबई डाक विभागामार्फत करण्यात आले. यामध्ये अंबिका योग कुटीरचे रामचंद्र बोरोडे, भावना कुलकर्णी,  नाना कांडपिळे यांनी प्रात्यक्षीकाद्वारे मार्गदर्शन केले.

      स्पेशल कॅन्सलेशन म्हणजे काय..? 
      आपण टपालावर तिकीट लावतो. ‘कॅन्सलेशन स्टँम्प’ हा टपालावरील वापरलेल्या तिकीटावर शाईने उमटविण्यात येतो जणेकरून एकदा वापरलेल्या तिकीटाचा चा परत वापर होऊ शकणार नाही. टपाल तिकीटांचा संग्रह करण्याची आवड असलेल्या आणि त्यांचा अभ्यास करणार्‍या लोकांच्या दृष्टीने अशा ‘स्पेशल कॅन्सलेशन स्टँम्प’ ला खास महत्व दिले जाते. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ औचित्य साधून योगविषयक संदेश सर्व टपालावर हिंदी व इंग्रजी भाषेतून उमटविण्यात आला. 

      योग ही काळाची गरज आहे. सद्ध्याच्या कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर शारीरिक तसेच मानसीक स्वास्थ्याच्या दृष्टीने योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे.  समाजात व डाक कर्मचार्‍यांमधे योगसंबंधीत जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने विवीध उपक्रमांचे आयोजन नवी मुंबई डाक विभागामार्फत करण्यात आले.- डॉ अभिजीत इचके, वरीष्ठ अधिक्षक डाकघर, नवी मुंबई डाक विभाग पनवेल